भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं (इस्रो) चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं. यानंतर जगभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यावर लगेचच दक्षिण अफ्रिकेतून शास्त्रज्ञांना व जनतेला संबोधित केलं. तसेच अफ्रिकेतून आल्यावर चांद्रयान ३ चंद्रावर उतरलं त्या ठिकाणाला नाव देण्याची घोषणा केली. यावरून विरोधकांनी मोदींवर शास्त्रज्ञांच्या कामाची प्रसिद्धी घेतल्याचा आरोप केला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी शनिवारी (२६ ऑगस्ट) जपानहून मुंबईत परत आल्यावर प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेस काय म्हणतं यावर मी बोलणार नाही. कारण तो नैराश्य आलेला पक्ष आहे. त्यांनी खूप आधीच देशाविषयी विचार करणं थांबवलं आहे. संपूर्ण देशाला माहिती आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. चांद्रयान ३ चंद्रावर उतरत होतं त्यादिवशीही मोदी दक्षिण अफ्रिकेतून याबाबत क्षणोक्षणीची माहिती घेत होते.”
“विरोधी पक्ष अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण करतोय”
“आपल्या शास्त्रज्ञांनी चांगलं काम केलं असेल, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान जाणार नाही, तर इतर कोण जाईल. विरोधी पक्ष अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण करत आहे. देशाला यश मिळतं तेही त्यांना बघवत नाही. विरोधीपक्षाची यापेक्षा वाईट स्थिती मी आतापर्यंत कधी पाहिलेली नाही,” अशी म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली.
व्हिडीओ पाहा :
“मी जपानला फिरायला गेलो नव्हतो”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाना पटोलेंना मी कधीच गांभीर्याने घेतलेलं नाही. ते सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी अजून वेगळं बोलतात. मी जपानला गेलो, तर भारतासाठी , मुंबईसाठी काही तरी घेऊन आलो. मी फिरायला गेलो नव्हतो.”
हेही वाचा : कांदा खरेदी नाफेड करणार ही तर शेतकऱ्यांची दिशाभूल, निर्यातशुल्क का रद्द करत नाही? नाना पटोलेंचा सवाल
“पटोले महाराष्ट्रभर कशासाठी फिरतात आणि काय करतात”
“नाना पटोले महाराष्ट्रभर कशासाठी फिरतात आणि काय करतात मला माहिती नाही. मात्र, ते माझे मित्र आहेत. त्यामुळे ते असं बोलले असले, तरी मी त्यांना माफ करतो,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.