ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी टीका केली. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मंगळवारी (४ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत, त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात अशा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे.”

“वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार”

“जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.

हेही वाचा : “आपल्याला एक फडतूस गृहमंत्री लाभलाय”, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र; म्हणाले, “लाचार, लाळघोटेपणा..”

“खरा फडतूस कोण याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती”

फडणवीस पुढे म्हणाले, “ज्या दिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं. त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे.”

हेही वाचा : “मोदी सूर्य, चंद्र आणि धूमकेतू आहेत”, राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तुरुंगात…”

“मी नागपूरचा, त्यांच्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते”

“ते जितक्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे. मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, याचं उत्तर त्यांना जनता देईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis answer criticism of uddhav thackeray over thane woman beating case pbs