केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतर औरंगाबाद शहराचं आहे की संपूर्ण जिल्ह्याचं यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे स्पष्टीकरण मागत निशाणा साधला. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी दानवेंचं ट्वीट रिट्वीट करत भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अंबादास दानवेंनी आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.”

“त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : “परकीय आक्रमकांच्या…”, औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर अंबादास दानवेंनी त्या निर्णयाचा फोटो शेअर करत म्हटलं, “हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल, तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हेही देवेंद्र फडणवीसांनी सांगावं.”