गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला विजयाबद्दल अभिनंदन करताना महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या उद्योगांवर टोला लगावला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. “उद्धव ठाकरेंकडे ब्रह्मास्त्रापेक्षा जास्त प्रभावी अस्त्र आहे,” असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंजवळ एक अस्त्र आहे. ते अस्त्र ब्रह्मास्त्रापेक्षा जास्त प्रभावी आहे आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र. त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊच शकत नाही. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, उद्धव ठाकरेंना उद्योगाचं महत्त्व कळायला लागलं. कारण तेच महाराष्ट्रातील उद्योग घालवणारे आहेत.”
“महाराष्ट्रात जे घडलं त्याचा परिणाम अजूनही त्यांच्या मनावर”
“देशातील सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा, सर्वात मोठ्या रोजगाराचा प्रकल्प असणारा रिफायनरीसारखा महाराष्ट्रातील प्रकल्प उद्धव ठाकरेंनी बाहेर घालवला. असा विजय मिळाल्यावर आपल्या विरोधकांचंही तोंडभरून कौतुक करायचं असतं. मात्र, अजून ते त्या मानसिकतेपर्यंत पोहचलेले दिसत नाहीत. अजूनही महाराष्ट्रात जे घडलं त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झालेला दिसतो आहे.”
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला. ते म्हणाले, “गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं.”
“भाजपाने मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास निर्माण केला”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये एक इतिहास उभा केला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं.”
“गुजरातमध्ये काँग्रेसचा आतापर्यंतचा निचांक”
“लोकांनी मोदींवर आणि भाजपावर पूर्ण विश्वास टाकला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ ते १७ जागा मिळताना दिसत आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा निचांक आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
“आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही घोषित केला होता असा आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी एका टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीत त्यांना किती जागा मिळणार हे लिहून दिलं होतं.”
हेही वाचा : गुजरातमध्ये भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे घोडदौड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “काँग्रेसला केवळ…”
“निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत हे दाखवलं”
“त्या किती जागा होत्या त्या त्यांना आणि त्या टीव्ही चॅनलला माहिती आहे. परंतु, आजच्या निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत आणि दिल्लीच्या बाहेर ते नेते नाहीत आणि त्यांचा पक्षही नाही हे दाखवून दिलं आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणीसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं.