राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात घर खरेदी करताना बिल्डरांकडून सामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी घर घेताना फसवणूक झालेल्यांना सरकार कसा दिलासा देणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. तसेच केवळ जाहिरातीच्या भरवशावर कुणीही घर घेऊ नये, असंही नमूद केलं.
“घर घेताना फसवणूक झालेल्यांना सरकार कसा दिलासा देणार?”
सुनील प्रभू म्हणाले, “मुंबई, ठाणे, डोंबिवली या भागात मध्यमवर्गीयांना घर घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याप्रमाणे दोषींवर कारवाई होईल. मात्र, त्या मध्यमवर्गीयाला आयुष्यात घर मिळणार नाही. त्याचं नुकसान होणार आहे त्यावर उपाययोजना केली पाहिजे. सरकार यावर काय भूमिका घेणार आहे?”
“सदनिका घेताना फसवणूक झालेल्या मध्यमवर्गीय ग्राहकांना सरकारकडून कशाप्रकारे दिलासा देण्यात येणार आहे?”, असा प्रश्न सुनील प्रभू यांनी विचारला. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
“बिल्डरने रेराची मान्यता असं लिहिलं, तरी रेराच्या वेबसाईटवर तपासा”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज सर्रास आपल्याला रेराची मान्यता असलेल्या जाहिराती दिसतात. मात्र, त्याला खरंच रेराची मान्यता आहे की नाही हे बघितलं पाहिजे. त्यामुळे माझं सामान्य जनतेला आवाहन आहे की, बिल्डरने रेराची मान्यता असं लिहिलं असलं तरी रेराच्या वेबसाईटवर ते तपासावं.”
“केवळ जाहिरातीच्या भरवशावर कुणीही घर घेऊ नये”
“रेराची वेबसाईट खूप सोपी आहे. सामान्य माणूसही ती सहजपणे वापरू शकतो. ती खात्री केल्याशिवाय केवळ जाहिरातीच्या भरवशावर कुणीही घर घेऊ नये,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.