पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानासाठी आयोजित केलं होतं. पण, नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाकडून एक पत्र आम्हाला देण्यात आलं आहे. मात्र, विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी पत्राऐवजी एक ग्रंथ दिला आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर केली आहे.
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून ( १७ जुलै ) सुरुवात होणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
“आमची ताकद वाढली आहे. या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता, विधिमंडळात जास्तीत जास्त चर्चा करण्यात येईल. विरोधी पक्षांच्या लोकहीताच्या प्रश्नांवर न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे. तरी, एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीने निर्माण केलेल्या संस्थांनी सरकारला कायदेशीर ठरवलं आहे. अशा सरकारला बेकादेशीर आणि असंवैधानिक म्हणायचं, हे अत्यंत चुकीचं आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आमचं सरकार आल्यावर उद्योग पळवण्यात आल्याचे आरोप केले गेले. पण, हे सरकार आल्यानंतर परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्रा पहिल्या क्रमांकावर होता. २०२० आणि २०२१ मध्ये कर्नाटक तर २०२१ आणि २०२२ मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला होता. आता पुन्हा २०२२ आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आला आहे,” अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.