भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पुरातन संस्कृती आणि त्यातील कौशल्यांविषयी बोलताना गंजविरोधी लोखंडाचा शोध भारतात २००० वर्षांपूर्वीच लागला असल्याचा दावा केला. तसेच या कौशल्याला पंतप्रधान मोदींनी बाजारपेठेशी जोडण्याचं काम केलं, असंही नमूद केलं. ते रविवारी (१७ एप्रिल) मुंबईतील ४० व्या ‘ हुनर हाट’ उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हडप्पा, मोहनजोदडो, राखीगडी, विराना अशा आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. त्यावेळी त्या ठिकाणच्या त्या संस्कृतींची ओळख तेथील कारागिरांनी त्यावेळी जे शिल्प तयार केले त्यावरून होते. भारतात मातीचे, लोखंडाचे आणि विविध धातुंचे शिल्प आपल्याला सापडतात. आपला वारसा असा आहे. सध्या आपल्याला अनेकदा गंजविरोधी लोखंडाची जाहिरात पाहायला मिळते. मात्र, भारतातील कारागिरांनी २००० वर्षांपूर्वीच गंजविरोधी लोखंड तयार केलं. ते आपण आजही पाहतोय.”
हेही वाचा : कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले “मला खात्री पटलीये की…”
“शहरीकरणामुळे भारतातील पुरातन कौशल्य लुप्त होत होते”
“मला वाटतं भारताचं हे कौशल्य आपल्या शहरीकरणामुळे, नागरिकरणामुळे हळूहळू लुप्त होत होतं. छोट्या छोट्या समुहांपर्यंत ही कौशल्य मर्यादित झालं होतं. तसेच बाजारपेठ उपलब्ध नसल्याने संपत होतं. या कौशल्याला बाजारपेठेशी जोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. आज त्याचा परिणाम असा झाला की ९ लाखपेक्षा अधिक लोकांना केवळ रोजगारच नाही, तर इतका फायदा मिळाला की त्यांचं कौशल्य ते वाढवू शकले,”