राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत बोलताना ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ या पुस्तकाचा उल्लेख केला. तसेच डॉ. आंबेडकरांचे काळ्या पैशाबाबत काय विचार होते हे सांगितलं. तसेच त्यांचा दूरदृष्टीपणा आणि अभ्यास याचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही डॉ. आंबेडकरांच्या कर्तुत्वाचं कौतुक केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्ववेत्ते होते, समाजसुधारक होते, अर्थशास्त्री होते, दुरद्रष्टे होते. त्यांनी १०० वर्षांपूर्वी ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक लिहिलं. १०० वर्षांनी आज आपण या पुस्तकात डोकावून पाहतो, त्यावेळी लक्षात येतं की, ही व्यक्ती किती द्रष्टी होती.”

“काळा पैसा कसा जमा होईल?”

“आपल्या रुपयाची काय अडचण आहे, महागाई का होते, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काळा पैसा कसा जमा होईल, त्या काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ‘गंगा भागीरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

व्हिडीओ पाहा :

“आपल्याच समाजात काही लोकं स्वतःला मोठं समजत होते आणि…”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “समाजात समता स्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं. आपल्याच समाजात काही लोकं स्वतःला मोठं समजत होते आणि इतरांना माणूसकीची वागणूकही देत नव्हते. अशा काळात मानवतेचा संदेश घेऊन समतेचं राज्य आहे, येथे कुणीही जन्माने मोठं होणार नाही, कर्माने मोठं होण्याची प्रत्येकाला संधी मिळेल, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला.”

“आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा वारंवार घेतली पाहिजे”

“आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा वारंवार घेतली पाहिजे. त्याच मार्गाने भारत देश जगातील सर्वोत्तम देश होऊ शकतो,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on dr babasaheb ambedkar thoughts on black money pbs
Show comments