सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच मे महिन्यात हा प्रकार घडूनही अद्याप या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्याबद्दल सरकारला धारेवर धरलं. यावेळी विरोधकांनी सरकारने तात्काळ कारवाई करण्याची मागणीही केली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२७ जुलै) मुंबईत पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुमचं मत मुसक्या बांधून फिरवलं पाहिजे असं आहे. आमचं मत आहे की, दोषींना भररस्त्यात फाशी दिली पाहिजे. असं असलं तरी केवळ मताने हे होत नाही. आपल्याला कायद्याचं पालन करावं लागतं. शेवटी राज्यात कायदा आहे. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या भावना कितीही तीव्र असल्या तरी कायद्याचं पालन करावं लागेल.”
“दोषींच्या मुसक्याच बांधल्या जातील”
“काहीही झालं तरी, ट्विटर इंडियाच्या पाठिमागे लागून या व्यक्तीची ओळख पटवून त्याला मुसक्याच बांधल्या जातील,” असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : सावित्रीबाईंवरील अश्लील पोस्ट आणि चित्रांवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले, “मोठ्या राजकारण्यांविषयी…”
“भारद्वाज स्पिक्स नावाच्या हँडलवरून आक्षेपार्ह लिखाण”
जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारद्वाज स्पिक्स नावाच्या हँडलने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा अवमान करणारं, स्त्रीशिक्षणाच्या त्या जनक नव्हत्याच अशाप्रकारचं लिखाण केलं. त्याचा शासनाने निषेध केला आहे आणि आज मी पुन्हा एकदा त्याचा निषेध व्यक्त करतो. हे कुणीच सहन करू शकत नाही. हा प्रकार झाल्यावर अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड पोलीस आयुक्तांकडे गेले होते. त्याच दिवशी आपण तात्काळ या ट्विटर हँडलवर गुन्हा दाखल केला. एवढंच नाही, तर ज्या वेबसाईटने हे प्रकाशित केलं त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “सावित्रीबाईंवर अश्लील लिहिणाऱ्याला मुसक्या बांधून रस्त्यावरून…”, बाळासाहेब थोरात आक्रमक
“विरोधी पक्ष अशा विषयात राजकारण करीत असेल, तर त्याचाही निषेध”
“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी ट्विटरकडून माहिती मागण्यात आली आहे. आतापर्यंत तीन वेळा पत्र लिहिण्यात आली आहेत. हे आरोपी शोधून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विरोधी पक्ष अशा विषयात राजकारण करीत असेल, तर त्याचाही निषेध केला पाहिजे. सावित्रीबाई फुले हा काही राजकारणाचा विषय नाही. त्यांचा अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. यात सत्ताधारी-विरोधक असा भेद होऊ शकत नाही,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.