विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदी विध्वंसावरून शिवसेनेला घेरलंय. “मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं, असंही फडणवीस यांनी नमूद केलं. ते मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपातर्फे आयोजित महाराष्ट्र दिन सन्मान सोहोळा सभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परवा म्हणाले बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. हे सांगतात आम्ही बाबरी मशिद पाडली. मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो. माझा शिवसेनेला सवाल आहे की तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता.”

“एवढंच नाही, तर त्याआधीच्या कारसेवेत याच राम मंदिरासाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. आम्ही लाठी गोळी खाण्याचं काम केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पाडली तेव्हा कुठं होतात? खरं म्हणजे बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेते गेला होता. एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

या सभेला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, सहप्रभारी जयभान सिंह पवैया, चंद्रकांत दादा पाटील, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.