बाळासाहेब ठाकरेंना स्वांतत्रवीर सावरकरांचा अभिमान होता. त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल कोणी चुकीचं बोललं, तर त्याला जशास तसं उत्तर मिळत होतं. मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी इतकं नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात, याचं वाईट वाटतं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. आज मुंबईत शिंदे गटाकडून ‘वारसा विचारांचा परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“बाळासाहेब ठाकरेंना स्वातंत्रवीर सावरकरांचा अभिमान होता. त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल कोणी चुकीचं बोललं तर त्याला जशास तसं उत्तर मिळत होतं. मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी इतकं नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात, याचं वाईट वाटतं. तुमचे-आमचे मतभेद झाले असतील, मान्य आहे. तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. मात्र, सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल, तर बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर केली आहे.
“बाळासाहेबांशी नातं हे रक्ताने होत नाही. ते विचाराने असावं लागतं. विचारांचं नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो विचाराचं नातं सांगेन तोच बाळासाहेबांचा खरा अनुयायी असेल, त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. रक्ताने एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील, पण विचाराने एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत”, असेही ते म्हणाले.