Aarey Car Shed : राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरची स्थगिती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमींकडून ‘आरे वाचवा’ आंदोलनाच्या माध्यमातून या कारशेडला विरोध केला जातोय. माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील आरे येथे कारशेड उभारण्यास विरोध केला असून राज्य सरकारकडून हा निर्णय सुडाच्या भावनेतून घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीला पूर येऊ शकतो, असा आरोप केला आहे. या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिठी नदीला येणारा पूर या कारशेडमुळ नव्हे, तर मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकांना परवानगी दिल्यामुळे येतोय, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >> बिल गेट्स, मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती
“आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते. मात्र सर्व अभ्यास त्यांनीच केला आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आरे येथे होत असलेल्या कारशेडला सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच या कारशेडसंदर्भातील सर्व अभ्यास करण्यात आला आहे. मिठी नदीला येणार पूर हा कारशेडमुळे नाही, तर तो या नदीशेजारी झालेल्या अतिक्रमणांमुळे आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांना परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे येथे हा पूर येत आहे. यावर जर लक्ष दिलं असतं, तर ही वेळ आली नसती,” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
हेही वाचा >> यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार! गणेश मूर्तीसाठी उंचीची मर्यादा नाही, परवानग्यांसाठी एक खिडकी योजना
आदित्य ठाकरे यांचे मत काय?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्यात आला होता. मात्र सत्ताबदलानंतर शिंदे सरकारने हा प्रकल्प पुन्हा एकदा आरे येथेच उभारण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या याच निर्णयाला आदित्य ठाकरे यांचा विरोध आहे. “महाविकास आघाडीचं सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं होतं. आम्ही ८०८ एकरचा परिसर जंगल म्हणून घोषित केला होता. हे करत असताना आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यात आले होते. कारशेड आपण कांजूरला नेण्याचा प्रयत्न करत होतो. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी येतात. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणं आहे,” अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी याआगोदर मांडलेली आहे.