मुंबई : महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वा. सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असे प्रतिपादन करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सावरकर होण्याची पात्रता नसल्याचे टीकास्त्र सोमवारी कांदिवलीत स्वा. सावरकर गौरव यात्रेत सोडले.
राहुल गांधी हे नकली आडनाव वापरत असून ते गांधी- सावरकर आणि देशभक्तही नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी प्रतिमेला पुष्पहार घातले. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल किंवा प्रियांका यांनी समाजमाध्यमांवरूनही आदरांजली वाहिली नाही. ठाकरे यांनी कोणाहीबरोबर जावे, मात्र शिवसेना, हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मी स्वा. सावरकर यांच्याप्रमाणे माफी मागणार नाही, या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका करीत फडणवीस म्हणाले, राहुल यांना इतिहास आणि वर्तमानही माहीत नाही. स्वा. सावरकर यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात सर्व तपशील आहे. इंग्रज सरकार त्यांना माफ करणार नाही, हे त्यांना माहीत होते. पण आपल्याबरोबर असलेल्या इतर राजकीय बंद्यांची सुटका व्हावी, यासाठी त्यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहिले होते. महात्मा गांधींनी स्वा. सावरकरांच्या बंधूना सूचना करून असे पत्र लिहिण्यास सांगितले होते आणि स्वा. सावरकरांनी माफी मागितली पाहिजे, असा लेखही लिहिला होता. राहुल हे कधीही स्वा. सावरकर होऊ शकत नाहीत असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.