कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला. यानंतर आता भाजपाकडून यावर सडकून टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करून हल्लाबोल केला. ते शुक्रवारी (१६ जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सावरकरांना अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे.”
“महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणता तो हाच आहे का?”
“माझा महाविकासआघाडीला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडिला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा : मुंबईतील महिला अत्याचारप्रकरणी सुप्रिया सुळे सरकारवर कडाडल्या; म्हणाल्या, “महाराष्ट्राचं गृहखातं…”
“आता उद्धव ठाकरेंचं मत काय हे त्यांनी सांगावं”
“आता उद्धव ठाकरेंचं मत काय हे त्यांनी सांगावं. यावरून उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ही तडजोड केली हे स्पष्ट होतं. मला असं वाटतं की, असे निर्णय घेऊन त्यांना कुणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरून पुसता येणार नाही,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.