गुजरात विधानसभा निवडणुकीत २७ वर्षांच्या सत्तेनंतरही सरकारविरोधी जनमताचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपा पुन्हा ऐतिहासिक विजयासह सत्तेत येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचारासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रेय दिलं. तसेच आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपा १७५ च्या आसपास जागा जिंकत असल्याचं म्हटलं. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये एक इतिहास उभा केला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं.”

“गुजरातमध्ये काँग्रेसचा आतापर्यंतचा निचांक”

“लोकांनी मोदींवर आणि भाजपावर पूर्ण विश्वास टाकला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ ते १७ जागा मिळताना दिसत आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा निचांक आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही वाचा : Gujarat Election Results 2022 Live: गुजरातमधील विजयानंतर अमित शाह यांचं ट्वीट, म्हणाले “इतिहास घडला आहे, सर्व विक्रम…”; वाचा प्रत्येक अपडेट

“आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही घोषित केला होता असा आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी एका टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीत त्यांना किती जागा मिळणार हे लिहून दिलं होतं.”

हेही वाचा : विश्लेषण: सी लिंकवर ८०, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर १०० तर ‘समृद्धी’वर १२०… महामार्गांचं स्पीड लिमिट ठरवतं कोण आणि कसं?

“निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत हे दाखवलं”

“त्या किती जागा होत्या त्या त्यांना आणि त्या टीव्ही चॅनलला माहिती आहे. परंतु, आजच्या निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत आणि दिल्लीच्या बाहेर ते नेते नाहीत आणि त्यांचा पक्षही नाही हे दाखवून दिलं आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणीसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis first reaction on gujrat election result 2022 pm narendra modi pbs