लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘आमची कीर्तन परंपरा जुनी आणि समृद्ध आहे. कीर्तनकारांनी कीर्तनातून, निरूपणातून, अभंगातून, गायनातून जे विचार समाजामध्ये पोहोचवले आणि समाजप्रबोधन केले, ते खऱ्या अर्थाने अवर्णनीय आहे. सध्या जग झपाट्याने पुढे चालले आहे, त्यामुळे आपली समृद्ध परंपरा जिवंत राहील का ? लोकांना प्रश्न पडतो. पण ज्यावेळेस मी तरुण कीर्तनकार पाहतो, त्यावेळी मला निश्चितपणे खात्री वाटते की आपली परंपरा कधीच संपू शकत नाही, तिचा नाश होऊ शकत नाही’, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा शुभारंभ आणि पु. ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातील चांदीच्या आकर्षक सन्मानचिन्हाचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कीर्तनकारांवर आधारित कथाबाह्य कार्यक्रम (रिऍलिटी शो) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विचारवंत, लेखक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभणार आहे. हा नवाकोरा कार्यक्रम १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा शुभारंभ आणि वीणेच्या रूपातील चांदीच्या आकर्षक सन्मानचिन्हाचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी, पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक, विविध संतांचे वंशज, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गीतकार ईश्वर अंधारे, परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील व ह.भ.प. राधाताई सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
‘महाराष्ट्राचा समृद्ध आध्यात्मिक वारसा ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि कीर्तन या परंपरेचा आत्मा आहे. कीर्तन परंपरेने भक्तिरसपूर्ण आणि रसाळ कथाकथनाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या लोकांचे प्रबोधन व उत्थान करीत त्यांना एकत्र आणले आहे. या परंपरेचा सन्मान करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा मंच उपलब्ध केल्याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे मनापासून कौतुक करतो. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे, जी महाराष्ट्राचा पवित्र वारसा जिवंत ठेवेल आणि त्याची भरभराट करेल’, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
कसा असेल कार्यक्रम?
महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून एकूण १०८ कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी ३ कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करतील. या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठी वाहिनीने दोन दिग्गज कीर्तनकार व परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील व ह.भ.प. राधाताई सानप यांच्यावर सोपविली आहे.