मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने भाजप-मनसे युतीचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी नवीन घर बांधल्याने ही कौटुंबिक भेट होती व त्यातून राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शेलार यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यातही भेटीगाठी झाल्या.
भाजप हिंदूुत्ववादी पक्ष असून मनसेनेही हिंदूुत्वाची कास धरली आहे. उभयपक्षी हिंदूुत्वाचा समान धागा आहे. मात्र परप्रांतीयांच्या विरोधाचा मुद्दा युतीमध्ये अडसर असून उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका आणि मुंबईसह राज्यातील भाजपची उत्तर भारतीयांची मते यावर मनसेशी युती केल्यास परिणाम होऊ शकतो, असे भाजप नेत्यांना वाटते.
फडणवीस यांनी पत्नी अमृता यांच्यासह राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावरून पुन्हा युतीचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. ठाकरे यांनी नवीन घर बांधले आहे आणि उभय नेत्यांनी कौटुंबिक संबंध ठेवणे, हे राज्यातील चांगल्या राजकीय संस्कृतीचे निदर्शक आहे. प्रत्येक गोष्टीत राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. भाजप सत्याच्या बाजूने असून जे सत्याची कास धरतात, ते भाजपबरोबर असतात, असे शेलार यांनी सांगितले.