राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलवर बोलताना थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “ललित पाटीलला डिसेंबर २०२० मध्ये जेव्हा अटक झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याला नाशिकच्या शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्यावेळी त्याची साधी चौकशीही करण्यात आली नाही,” असा आरोप फडणवीसांनी केला. तसेच ही चौकशी होऊ नये म्हणून कुणाचा दबाव होता, असा प्रश्न विचारला. ते शुक्रवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ललित पाटीलला अटक झाली १०/११ डिसेंबर २०२० मध्ये. जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकच्या शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. आता आश्चर्य बघा की, गुन्हा मोठा होता आणि ललित पाटीलला अटक झाल्यानंतर १४ दिवसांचा पीसीआर (रिमांड) मिळाला. पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला दाखल झाले. तसेच पूर्ण १४ दिवस पीसीआरमध्ये ससूनमध्ये दाखल होते. यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात आम्ही आरोपीची चौकशी केली नसल्याचं अथवा त्यांचा आजार योग्य नसल्याचं सांगत अर्जही करण्यात आला नाही.”

“आता माझा प्रश्न आहे की, ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही?”

“शेवटी १४ व्या दिवशी ललित पाटीलचा एमसीआर करून टाकण्यात आला. त्यामुळे या गुन्ह्यात आम्ही खोलात जात आहे तेव्हा गुन्हेगाराची चौकशीच झालेली नाही. उद्या यांच्याविरोधात खटला तयार करायचा आहे, तर काय खटला उभा राहणार आहे. चौकशीच केली नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

“ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही?”

“आता माझा प्रश्न आहे की, ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही? याला कोण जबाबदार होतं? तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते की, गृहमंत्री जबाबदार होते? त्यावर कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावात हे झालं, यात कुणाचे संबंध होते. यात खूप गोष्टी आहेत, मात्र त्या मी आज सांगणार नाही,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सूचक इशारा दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mention uddhav thackeray name in lalit patil drugs case pbs