मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. दोन्ही आरक्षणांवरून विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तसेच, “राज्यात सत्ता आल्यास ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन“, अशी भीमगर्जनाच देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘संन्यास’ विधाना वर खोचक प्रतिक्रिया दिली होती. “मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही. गरज पडली, तर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची राज्याला गरज आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. त्यावर आता फडणवीसांनी देखील प्रतिटोला लगावला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…!

“मी यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार”

राज्याच्या राजकारणाला सगळ्यांची गरज आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. “मी यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे. मी ज्यावेळी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो. मला माहितीये की संन्यास घ्यायची गरजच येणार नाहीये. पण जे करण्यासारखं आहे ते हे करत नाहीयेत. म्हणून मी तसं बोललो. आणि राऊत म्हणतात ते खरंच आहे की राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. माझीही गरज आहे, त्यांचीही गरज आहे. राजकारण एका पक्षाचं नसतं. राजकारणात विरोधकही पाहिजेत. सगळ्याच प्रकारच्या लोकांची गरज आहे” असं ते म्हणाले.

“हे तर भाजपाचं वैफल्य”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला!

राऊतांच्या बोलण्याप्रमाणे मतं बनवायला लागलो तर…

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या विधानांना गांभीर्याने घेत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला देखील लगावला. “संजय राऊत एक असे व्यक्ती आहेत जे सकाळी काही सांगतात, दुपारी काही सांगतात, संध्याकाळी अजून काही सांगतात आणि दुसऱ्या दिवशी तिसरंच काहीतरी सांगतात. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही आपलं मत बनवायला लागलो आणि तुम्हीही बातमी बनवायला लागलात, तर तुमची बातमी योग्य होणार नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Story img Loader