मुंबई : देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहखाते मिळावे, या मागणीवर ते ठाम असून भाजपची त्यास तयारी नाही. त्यामुळे आता गृहखात्यावरून तिढा असून हे खाते कोणाकडे जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून त्या वेळी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाहून ठाण्यात परतले. ते सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी आल्यानंतर महायुतीतील खातेवाटप व मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले असून नेता निवडीसाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> सागरी किनारा मार्गावर ‘रात्रीस खेळ चाले’; धनदांडग्यांच्या ‘रेसिंग’मुळे स्थानिक हैराण, ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघातांची भीती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकोपयोगी योजना राबविल्याने व महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याने जनतेने भरभरून मते दिली, असे शिंदे यांनी रविवारी सातारा येथील पत्रकार परिषदेतही नमूद करून महायुतीच्या यशात आपलाही मोठा वाटा असल्याचे व सत्तेतही मोठा सहभाग अपेक्षित असल्याचे संकेत दिले. शिंदे यांच्या अनुपस्थितीतच पवार यांच्याशी चर्चा करून भाजपने शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला आयोजित करण्याची घोषणा केली. पण अजून महायुतीतील तीनही पक्षांना किती मंत्रीपदे मिळावीत, खातेवाटप कसे असावे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून मंत्रीपदांसाठी कोणाची निवड केली जाणार, या बाबींवर शिंदे, फडणवीस व पवार यांच्यात सोमवारपासून चर्चा सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेतून मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीत चर्चेची आणखी एक फेरी होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. शिंदे हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत हेच त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट झाले.

शिंदे हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून दरे गावी गेल्याने महायुतीतील चर्चा थांबली होती. शिंदे, फडणवीस व पवार यांनी मुंबईत चर्चा करून खातेवाटप व संभाव्य मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेण्याची सूचना शहा यांनी दिल्लीतील बैठकीत दिली होती. पण शिंदे गावी गेल्याने व आजारी पडल्याने ही चर्चा होऊ शकली नाही. या तीनही नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सोमवारपासून सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

महत्वाची खाती भाजपकडे?

●मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा निर्णय मान्य राहील, असे शिंदे यांनी बुधवारी जाहीर केले.

●शहा यांच्याबरोबर गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतही त्यांनी आपली भूमिका मांडली व गृह, नगरविकास, आरोग्य, परिवहन खात्यांबरोबरच विधान परिषदेच्या सभापतीपदाची मागणी केली होती.

●भाजपने सभापतीपद व गृह खाते देण्यास नकार दिला असला तरी शिंदे यांची गृहखात्याची मागणी कायम आहे.

●मात्र भाजपशासित राज्यात गृह व अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच असावीत, असे पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे गृहखाते शिंदे यांना देण्याची भाजपची तयारी नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis name confirmed for maharashtra chief minister by bjp party leaders zws