पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी मुंबईतल्या इस्कॉन मंदिरालाही भेट दिली. नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस दिलखुलासपणे हसले. कॅमेरात ही दृश्यं कैद झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ

महायुतीला महाराष्ट्रात न भुतो न भविष्यती असं यश मिळालं. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक विक्रमही या निवडणुकीने घडवून दिला. हा विक्रम म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा म्हणजेच २०१४, २०१९ आणि २०२४ या वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला १०० हून अधिक जागा मिळाल्या. २०२४ च्या प्रचाराच्या वेळी देवाभाऊ हे नाव देवेंद्र फडणवीसांना संबोधण्यासाठी वापरण्यात आलं. हे नाव त्यांनाही खूप आवडलं. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची ओळख देवाभाऊ, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ अशीही होऊ लागली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना देवाभाऊ अशी हाक मारली आणि देवेंद्र फडणवीस दिलखुलासपणे हसले.

देवाभाऊ हे नाव कसं समोर आलं?

देवाभाऊ म्हणून चर्चेत आणण्याची गरज का पडली असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, देवाभाऊ हे माझं नाव मागच्या आठ ते दहा वर्षांपासून आहे. हे नाव इंटरनेट कम्युनिटीतलं आहे. मी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झालो होतो तेव्हापासून मला देवाभाऊ असं म्हटलं जातं. आता ते नाव म्हणजेच देवाभाऊ हे आता कार्यकर्तेही म्हणत आहेत. माझं नाव देवाभाऊ असं का करत आहात? असं काही मी कुणाला रोखलं नाही. कारण कुठलाही नेता म्हटला की कार्यकर्ते आणि जनता हा त्याचा परिवार असतो. त्यामुळे ज्या गोष्टीने भावनिक नातं प्रस्थापित होतं त्या गोष्टी चांगल्या असतात. देवेनभाऊ म्हणायचे त्याचं देवाभाऊ झालं इतकंच तसंच ते मलाही आवडतं असं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. आज याच नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाक मारल्याने देवेंद्र फडणवीस दिलखुलासपणे हसले. हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पोस्ट केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सलग तीनवेळा महाराष्ट्रात भाजपाला मिळवून दिलं मोठं यश

मुख्यमंत्री या पदावर विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सलग तीन वेळा भाजपाला मोठं यश मिळवून दिलं आहे. तसंच भाजपाचं महाराष्ट्रातलं बळ वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. २०२४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या. ही बाब निश्चितच देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व दाखवणारीच ठरली. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे देवाभाऊ हे नाव त्यांना आधीच मिळालं असलं तरीही २०२४ च्या निवडणूक प्रचारात ते अधिक प्रभावीपणे समोर आलं. देवाभाऊ या नावाचा प्रभाव किती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तोच उल्लेख केल्याने अधोरेखित झालं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis news pm narendra modi called him devabhau after he smiled scj