“झुकेगा नहीं साला” म्हणत मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानसमोरुन आमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना इशारा देणाऱ्या मुंबईतील आजीबाईंच्या भेटीसाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी पोहोचले होते. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली. याच भेटीवरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९२ वर्षांच्या चंद्रभागा आजी मातोश्री बाहेर थांबलेल्या…
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राणा दाम्पत्याने थेट मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर अनेक शिवसैनिकांसह ९२ वर्षांच्या चंद्रभागा आजी देखील मातोश्रीबाहेर थांबल्या होत्या. तसंच त्यांनी थेट राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला होता.

तुझी हिंमत कशी झाली?
चंद्रभागा आजींचा जोश पाहून आसपासच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी केली होती. “रवी राणा दोन दिवस मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना कार्यकर्ते त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली?”, असा सज्जड सवालच आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

“रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे”
चंद्रभागा आजींचा जोश पाहून आसपासच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी केली होती. “रवी राणा दोन दिवस मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना कार्यकर्ते त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली?”, असा सज्जड सवालच आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

आजींनी दिलेलं आव्हान…
“आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार नाही का? साहेबांसाठी आम्ही झटणार. तिला (नवनीत राणा) वाटतं दोघंजण येऊ आणि गुपचूप जाऊ, पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही मातोश्रीवर येऊन दाखवाच”, असं आव्हान आजीबाईंनी दिलं होतं.

आजी आणि मुख्यमंत्री भेटीवर फडणवीस काय म्हणाले?
पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीसंदर्भात विचारण्यात आलं असतं फडणवीस यांनी या प्रश्नावरुन खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. “त्या आजींनी काय म्हटलं मुख्यमंत्र्यांसमोर ते जाऊ द्या. त्या विषयावर मी अधिक बोलत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी असाच वेळ काढून एखाद्या एसटी कर्मचाऱ्याच्या आईची भेट घेतली असती, तिला समजावलं असतं तर बरं झालं असतं,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. याच पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या उत्तराच्या ओळी फडणवीस यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुनही पोस्ट करण्यात आल्यात. “वृध्द मातेला मुख्यमंत्री भेटले, हे चांगलेच झाले. पण त्या वृद्ध मातेने जो आक्रोश केला, तो मुख्यमंत्री समजून घेणार आहेत का? त्यांनी जी व्यथा व्यक्त केली, ती समजून घेणार का? असेच त्यांनी एस टी कामगाराच्या कुटुंबीयांची सुद्धा भेट घ्यावी,” असं फडणवीस म्हणाल्याचं ट्विट करण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांनी आधी केला होता फोन
दरम्यान, चंद्रभागा आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांनीच मातोश्रीमधून त्यांना फोन करून भेटीसाठी बोलावून घेतलं होतं. यावेळी फोनवर देखील चंद्रभागा आजींनी उद्धव ठाकरेंना तुमच्यासाठी आम्ही इथं बसलो असल्याचं सांगितलं होतं. “उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काळजी घ्या. फार वेळ बसू नका. चहापाणी झालं. मी म्हटलं साहेब जय महाराष्ट्र, तुमच्यासाठी आम्ही इथे बंगल्याच्या बाहेर उभे आहोत. ती कशी येतेय ते बघू आम्ही. मी इथेच बसणार. मातोश्रीवर तुम्हाला कुणी काही बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही”, असं उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितल्याचं चंद्रभागा आजीनं सांगितलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on cm uddhav thakceray meeting old lady scsg