राज्यात शिवसेना आणि भाजपा यांचा काडीमोड होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर देखील या काडीमोडाविषयी राजकीय चर्चा सुरूच आहेत. त्यातही, ऐन निवडणुकांआधी भाजपानं पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेली मेगाभरती बरीच चर्चेत राहिली. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातले अनेक मोठे नेते देखील भाजपाच्या गळाला लागले. मात्र, यावरून भाजपावर टीका करणारा देखील एक वर्ग राजकीय वर्तुळात असून त्यांच्यामते या मेगाभरतीमुळे निवडणुकीआधीच भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसला आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला. मात्र, या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपानं त्या काळात नेमकी मेगाभरती का केली होती, याची दोन कारणं स्पष्ट केली आहेत.
आपल्याकडे दगड उचलला तरी काँग्रेसचा निघायचा!
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मेगाभरतीमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेल्याबाबत विचारणा केली असता फडणवीसांनी यावर उत्तर देताना मेगाभरतीची दोन प्रमुख कारणं सांगितली. “आम्ही लोकं का घेतले? एक तर काही लोकं अशा ठिकाणी घेतले जिथे पक्षाचा विस्तार करण्याची गरज होती आणि तिथे आमची ताकद कमी होती. इतिहास पाहिला तर असेच वेगवेगळ्या पक्षातून लोकं आमच्याकडे आले आहेत. पूर्वी तर काँग्रेसच होता. आपल्याकडे दगड उचलला तरी काँग्रेसचा निघायचा अशी अवस्था होती”, असं फडणवीस म्हणाले.
आमच्यापेक्षा जास्त लोकं सेनेनं घेतले!
दरम्यान, यावेळी दुसरं कारण सांगताना फडणवीसांनी भाजपापेक्षा जास्त लोकं शिवसेनेनं घेतल्याचा दावा केला. “दुसरं कारण म्हणजे आमची आघाडीची चर्चा सुरू होती, तेव्हा आमचं ठरलं होतं की सीटिंग आमदार ज्या पक्षात येईल, त्याला ती जागा मिळेल. ज्या ठिकाणी आमचे लोकं हरले होते आणि दुसऱ्या पक्षाचे सीटिंग आमदार होते, तिथे शिवसेनेनं त्यांना पक्षात घ्यायचा सपाटा लावला. त्यामुळे आमच्यापेक्षा जास्त लोकं शिवसेनेनं घेतले. काही मंडळी आम्ही घेतली नाहीत, तर सेनेत जात होती. त्यातली काही लोकं आज मंत्री देखील आहेत. त्यामुळे आम्ही जर तेव्हा त्यांना घेतलं नसतं, तर ते शिवसेनेत गेले असते. आणि आम्ही ज्या जागांवर ५-१० हजार मतांनी हरलो, तिथे आमच्या हिशोबाने ती सीट शिवसेनेला गेली असती. त्यामुळे काही लोकं पक्षविस्तारासाठी तर काही लोकं जागा वाचवण्यासाठी आम्ही भरती केली”, असं फडणवीस म्हणाले.
“पाठीत खंजीर खुपसला गेला होता, त्यावेळच्या भावनेतून…!” ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा!
आलेल्यांपैकी कुणी बाहेर जाणार नाही!
भाजपामध्ये आलेल्या लोकांपैकी कुणीही आता दुसरीकडे जाणार नसल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. “पक्षात जे आले, त्यातलं कुणी बाहेर जाईल असं वाटत नाही. जे निवडून आले त्यापैकी तर कुणीही जाणार नाही. राजकीय लोकांना राजकारण समजतं. त्यांना ५ वर्षांनंतरचं दिसतं. त्यांना माहितीये की २०२४मध्ये मोदींचंच सरकार येणार. त्यामुळे हे काही इकडे-तिकडे जाणार नाहीत. पण यातल्या काही लोकांना टोकाचा त्रास दिला जातोय. त्यांचे कारखाने बंद कसे होतील वगैरे. पण तरीदेखील ते आमच्यासोबत आहेत. कारण त्यांना माहितीये की भविष्यात हा पक्षच मोठा होणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.