मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा; विरोधकांची फडणवीस यांच्यावर टीका
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांची निष्पक्ष यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची घोषणा विधिमंडळात करतानाच, ‘तत्वांशी तडजोड करण्याची वेळ येईल तेव्हा सत्तेवर लाथ मारुन बाहेर जाईन,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करीत विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हल्लाबोल केला. झोपु प्रकरणात आरोप केलेल्या संदीप येवले यांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. सुभाष देसाईंसह अन्य मंत्र्यांवर झालेल्या आरोपांचीही चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून दोन्ही सभागृहात करण्यात आली.
मेहता, सुभाष देसाई यांच्यासह काही मंत्र्यांवर वेगवेगळ्या प्रकरणांवरुन गेले काही दिवस अनेक आरोप झाले आहेत. वेगवेगळी प्रकरणे उघड होत आहेत. मेहता यांनी एमपी मिल येथील प्रकरणात ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते,’ असा शेराही फाईलवर लिहील्याने गदारोळ झाला होता. त्यानंतर सारवासारव करीत काही फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे नेल्या होत्या, पण त्यात या प्रकरणाची फाईल नव्हती, असे मेहता यांनी सांगितले होते. मात्र मेहता यांच्या वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असून भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या आणि पारदर्शक कारभाराच्या घोषणा वल्गना ठरल्या असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला व मेहतांची चौकशी करण्यासाठी दबाव येऊ लागला. आता मेहता यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांवर टीका
एमपी मिल प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी फाईलवर लिहिल्याप्रमाणे माहिती दिली होती की नव्हती किंवा त्यांचा काही संबंध आहे का, हे उघडपणे जाहीर करण्याचे आव्हान देत आमच्याकडेही आता बैलगाडीभर पुरावे जमा झाले आहेत, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल काहीच कारवाई न करणाऱ्या आणि त्यांच्यावर जरब ठेवू न शकणाऱ्या मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा डागाळू लागली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री परदेशात फिरत असताना उद्योगमंत्री संपादित जमिनी परत करीत असल्याबद्दल झोड उठवीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्णयांचीही मुख्यमंत्र्यांना माहिती व मान्यता होती का, असे सवाल पाटील यांनी केले. हाच काय तुमचा पारदर्शी कारभार, असा सवाल करीत, सरकारचा कारभार म्हणजे ‘काळूबाळू’ चा तमाशा सुरु असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी सोडले.
विरोधकांकडून सादर करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात प्रमुख मुद्दय़ांपैकी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला. जयंत पाटील यांनी मेहता, सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदी मंत्र्यांवर झालेल्या आरोपांचा उल्लेख करुन थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे मुख्यमंत्री अनुकरण करीत असतात, पण त्यांची मंत्री व खासदार यांच्यावर जशी जरब आहे, तसा मुख्यमंत्र्यांचा वचक येथे नाही, अशी टिप्पणी करीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला. मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना त्या प्रकरणात कल्पना दिली नसताना फाईलवर तसे लिहीले असेल तरी त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पण याप्रकरणी माहिती दिली होती की नव्हती, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला हवे. पंतप्रधान स्वच्छ कारभाराबद्दल बोलत असतात, पण प्रत्यक्षात सरकारचा कारभार तसा नाही. एकनाथ खडसे यांना एमआयडीसीने संपादित न केलेली तीन एकर जमीन खरेदी केली, म्हणून मंत्रिमंडळातून काढण्यात आले. मात्र सुभाष देसाई यांच्यावर कारवाई का नाही,असा सवाल केला.