निर्णय लांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चौकशीची खेळी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वत:हून दिलेला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी नाकारला. देसाई यांचा राजीनामा स्वीकारला, तर मेहता यांचाही राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढेल, हे ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाई यांना राजीनाम्यापासून रोखल्याचे समजते. देसाई यांची चौकशी कोणत्या निष्पक्षपाती यंत्रणेकडून करायची, हे मुख्यमंत्र्यांनी अजून गुलदस्त्यातच ठेवले असून या चौकशीच्या निष्कर्षांनंतरच ‘योग्य निर्णय’ घेऊ, असे देसाई यांना सांगितले. दरम्यान, पक्ष देसाई यांच्या पाठीशी असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मेहता आणि देसाई या मंत्रिद्वयाच्या भ्रष्टाचारावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केल्याने मेहता यांची लोकायुक्तांकडून तर देसाई यांची निष्पक्ष यंत्रणेकडून चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधिमंडळात केली. चौकशीत कोणताही दबाव असू नये, यासाठी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी विरोधकांनी लगेच केली. मात्र फडणवीस यांनी ती अमान्य केली.

मुख्यमंत्र्यांची खेळी

सुभाष देसाई यांचा राजीनामा स्वीकारला तर प्रकाश मेहता यांचाही राजीनामा घ्यावा लागेल आणि त्यासाठी विरोधकांकडूनही दबाव येईल, हे ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाई यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मुंबईत झालेल्या २६/११च्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव आला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राजकीय खेळी करीत फडणवीस यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करून देसाई यांना राजीनाम्यापासून रोखले.

मेहतांबाबत प्रश्नचिन्ह

प्रकाश मेहता यांनी एमपी मिल येथील झोपु योजनेच्या फाइलवर ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’, असा शेरा लिहिल्याने ते वादात सापडले. प्रत्यक्षात त्यांनी मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी माहिती दिली किंवा कसे याबाबत विधिमंडळात आरोप-प्रत्यारोप झाले. मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून परस्पर निर्णय घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई आवश्यक ठरते आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने बिल्डरच्या लाभाचा निर्णय झाला असेल, तर ते अधिक गंभीर असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मेहता यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती की नव्हती, या बाबी आता चौकशीतच उघड होतील. मात्र हे प्रकरण चिघळत जाण्याची शक्यता आहे. मेहता यांच्याबाबत फडणवीस आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी मात्र माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावेळी घेतली तशी भूमिका घेतलेली नाही.

ठाकरे यांची खेळी

देसाई यांच्यासह शिवसेनेच्या काही मंत्र्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे यांच्याकडे आमदार व पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांच्यासह आणखी एक-दोन मंत्र्यांना पक्षकार्यासाठी पाठविण्याचा ठाकरे यांचा विचार होता. देसाई यांनी पंचाहत्तरी पार केली असून आता पक्षकार्य करावे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. आता ते आरोपांच्या फेऱ्यात अडकल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर स्वत: राजीनामा फेटाळण्यापेक्षा त्यांना मुख्यमंत्र्यांकडे पाठविले. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी देऊ केलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला, ठाकरे यांनी त्यांना पाठीशी घातले नाही, असे चित्र निर्माण करण्याची राजकीय खेळी ठाकरे यांनी केली.

घटनाक्रम..

  • ’देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी याप्रकरणी शुक्रवारी रात्री चर्चा केली
  • ’ठाकरे यांनी राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची सूचना देसाई यांना केली
  • ’देसाई यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनाम्याची तयारी दाखविली
  • ’मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून देसाई यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले
  • ’चौकशीत जे निष्कर्ष येतील, त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी देसाई यांना सांगितले
  • ’राजीनामा देण्याची आपली तयारी असून चौकशीला संपूर्ण सहकार्य करून चौकशीतून जे निष्कर्ष निघतील ते मान्य करू, असे देसाई यांनी स्पष्ट केले

मंत्र्यांवर आरोप करणारेच भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. राजकारणाची पातळी खूप घसरली आहे. त्यांना आपल्या कृत्यांची लाजही वाटत नाही. आरोप केल्यावर राजीनामा देण्याचा पायंडा पाडला, तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसे होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणे चौकशी होईल, असे वचन दिले आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, ही अपेक्षा. शिवसेना देसाई यांच्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

चौकशी कोणाकडून?

एमआयडीसीसाठी संपादित केलेली सुमारे ३२ हजार एकर जमीन परत करण्याप्रकरणी निष्पक्षपातीपणे स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. मात्र ही चौकशी कोणाकडून होईल, हे त्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवले आहे.

मेहता यांचाही राजीनामाही मुख्यमंत्र्यांनी नाकारला!

मुंबई : शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याप्रमाणेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनीही आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला होता. तथापि देसाई यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी मेहता यांचाही राजीनामा स्वीकारला नाही.

Story img Loader