“मी जेव्हा म्हणालो राम जन्मभूमीच्या आंदोलनात अयोध्येमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, तर किती मिरची लागली. अरे मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू? अरे हो, मी गेलो होतो बाबरी पाडण्यासाठी याचा मला अभिमान आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यानंतर आज(रविवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा झाली. या सभेची सुरूवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने झाली. फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
यावेळी फडणवीस म्हणाले, “१९९२ साली फेब्रुवारीमध्ये मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक अॅड. देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. सहलीला चला, सहलीला चला, सहलीला चला… असं नाय. अरे लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे… असं सांगत गेलो होतो. तुम्ही गेले होते सहलीला आम्ही नव्हतो गेलो सहलीला. तेव्हा तर सोडाच त्याच्या एक वर्ष अगोदर ज्यावेळी पहिला कारसेवा झाली आणि आमच्या कोठारी बंधूंना त्या ठिकाणी मारलं तरी देखील भगवा झेंडा त्या बाबरी ढाच्याच्यावर आमच्या कोठारी बंधूंनी लावला. त्या कारसेवेला देखील हा देवेंद्र फडणवीस गेला होता. नुसात गेलाच नव्हता अनेक दिवस बदायूच्या तुरुंगात देखील होता. अजूनही आम्हाला बदायूचे ते कारागृह आठवते जिथे आम्ही वाट पाहत होतो की आपण तर पोहचलो आहोत, कोणीतरी शिवसैनिक दिसेल. आम्ही वाट पाहत बसलो मात्र कोणीच दिसला नाही. एवढच नाही त्याच्या अगोदर १९ व्या वर्षी काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू झाला विद्यार्थी परिषदेसोबत त्या काश्मीरमध्ये देखील जाऊन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी, तिथे मनोबल वाढवण्यासाठी गेलेला हा देवेंद्र फडणवीस आहे.”
“कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे” ; फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा!
तसेच, “आम्ही फाईव्हस्टारचं राजकारण नाही केलं, जमिनीवरचं राजकारण केलं आहे. कुठल्या हॉटेलवर झोपलो नाही, प्लॅटफॉर्म आणि फूटपाथवर झोपलो, मंदिरांमध्ये झोपलो. सगळ्यांसोबत संघर्ष केला. गोळ्या चालताना पाहिल्या, लाठ्या मारतांना पाहिल्या आणि लाठ्या खाल्ल्या देखील म्हणून इथपर्यंत पोहचलो. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.
याचबरोबर, “जेव्हा अयोध्येत बाबरी ढाचा पडत होता आणि आम्ही म्हणत होतो लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तेव्हा सांगा शेपट्या कोणी टाकल्या होत्या? अन् कुठे टाकल्या होत्या? कारसेवकांची थट्टा करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो जेव्हापण या देशाला गरज असेल, आम्ही पुन्हा कारसेवक बनून जाऊ आणि या देशाच्या धर्माच्या, संस्कृतीच्या सुरक्षेसाठी आम्ही जाऊ.” असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे –
याचबरोबर “काल काय म्हणाले उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांनी पाय जरी ठेवला असता तर बाबरी ढाचा पडला असता. केवेढा मझ्यावर विश्वास आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, कशाला लपवायचं आज माझं वजन १०२ किलो आहे आणि जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन १२८ किलो होतं. पण उद्धव ठाकरेंना ही भाषा समजत नाही म्हणून त्यांच्या भाषेत सांगतोय, सामान्य माणसाचा एफएसआय जर 1 असेल, तर माझा एफएसआय 1.5 आहे आणि बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता. उद्धव ठाकरे तुम्हाला असं वाटतंय माझ्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही माझं वजन कमी करू शकत असाल, लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्या शिवाय थांबणार नाही. लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धव ठाकरे त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून रहा. जेवढं वजन वर दिसतं त्यापेक्षा दुप्पट खाली आहे.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.