संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या विधानाचा निषेध केला आहे. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – विधिमंडळाबाबत केलेल्या विधानावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण, विरोधकांच्या हक्कभंगाच्या मागणीवरही केलं भाष्य; म्हणाले, “माझ्यावर जर…”

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“विधिमंडळाला चोर म्हणणं हे सहन करण्यासारखं नाही. या विधानमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक मोठे नेते या सभागृहाने बघितले आहेत. आपल्या राज्याचं विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असं विधानमंडळ आहे. या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला दिला, तर जनतेचा या सभागृहावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे राऊतांच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“…मग उद्धव ठाकरे देखील चोरमंडळाचे सदस्य ठरतात”

“हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही. विधिमंडळ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सभागृहाचे सदस्य आहे. मग तेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात. आम्ही सर्वचचोर मंडळाचे सदस्य ठरतो. राऊतांनी केवळ चोरमंडळ नाही, तर गुंडमंडळ असा शब्दही वापरला आहे. आम्ही काय गुंड आहोत का?” असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला.

हेही वाचा – संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची भाजपाची मागणी, विधानसभा अध्यक्षांना दिलं पत्र; विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं भोवणार?

“राऊतांच्या विधानाचा निषेध करावाच लागेल, अन्यथा…”

“संजय राऊत हे साधे नेते नाहीत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. अशा मोठ्या सभागृहाचे सदस्य जर अशा प्रकारे बोलत असतील, तर आपण कसं सहन करायचं? त्यामुळे त्यांच्या या विधानाचा निषेध केला नाही, उद्या १०० राऊत तयार होऊन या विधानमंडळाला रोज चोर म्हणतील”, असेही ते म्हणाले.

Story img Loader