केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, वादावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेसाहेबांच्या मागे ठाम उभे आहोत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बोलण्याच्या भरात कदाचित राणे साहेब ते बोलले असतील, ते वापरायचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. तथापि मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचे पद आहे, त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री विसरतात, यामुळे कोणच्या मनात संताप होऊ शकतो, तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो”
ठाकरे सरकार पोलिसजीवी झालंय
“वासरू मारलं तर आम्ही गाय मारू हे योग्य नाही, भाजप राणे यांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल मात्र राणे यांच्या पाठीशी उभा राहील, असेल. शर्जील उस्मानी राज्यात येतो आणि भारत मातेबद्दल बोलतो मात्र कारवाई होत नाही. आता इथे पोलीस राणेंवर कारवाईसाठी निघाले आहेत. पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे. सरकारने बस म्हंटल्यावर काही लोकं लोटांगण घालत आहे, केवळ काही लोकांना खुश करण्याकरता हे करत असतील तर ते महाराष्ट्रसाठी योग्य नाही. पोलीसजीवी सरकार झालेलं आहे. माझा सल्ला आहे पोलिसांनी कायद्याने काम करावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – “हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं,” नारायण राणेंची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका
भाजपा त्या वक्तव्याच्या नाही मात्र राणेंच्या पाठिशी
“कायद्याच्या भाषेत हा गुन्हा दखलपात्र नाही. पण त्याला जबरदस्तीनं दखलपात्र गुन्हा करायचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा गैरवापर होतोय. महाराष्ट्र पोलिसांचं काम मला माहित आहे. ते निष्पक्ष आहेत. पण आता त्या पोलिसदलांचा ऱ्हास होत आहे. बस म्हटल्यावर काही जण लोटांगण घालतात. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागली तर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळेल. आयुक्त स्वताला छत्रपती समजतात का?, जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना अटक करा, ही काय भाषा आहे का?, ते काय स्वताला छत्रपती समजतात का?”असा आक्रमक पवित्रा देखील देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
हेही वाचा – “मी काय साधा माणूस वाटलो का?”, अटकेच्या वृत्तावरुन नारायण राणे संतापले
तालिबान नाही, कायद्याचे राज्य असले पाहिजे
“आम्ही हिंसा करत नाही, आम्ही राडेबाज नाही, उद्या आमच्या कार्यालय हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पोलस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू. तालिबान नाही, कायद्याचे राज्य असले पाहिजे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच नारायन राणे यांना अटक झाली तरी जण आशीर्वाद यात्रा पूर्ण करू, प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात यात्रा सुरू राहील, असे फडणवीस म्हणाले.