राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे . डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने राजकीय आरक्षण रद्द झाल्याने संतप्त भावना असलेल्या इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईत विधानभवन येथे तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माधम्यांशी संवाद साधला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो म्हटल्यानंतर त्याबाबत फडणवीसांनी भाष्य केले आहे.
“भाजपातर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा महाराष्ट्रातून निवडून राज्यसभेवर जात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. त्यासोबत अनिल बोंडे यांचा कृषीविषयक अभ्यास आहे. धनंजय महाडिक यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले आहेत. मला विश्वास आहे की आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला पाहिजे तर घोडेबाजार होणार नाही. जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. सदसदविवेक बुध्दीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज आम्ही विचारपूर्वकच भरला आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू, असे फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
“संभाजीराजे छत्रपती यांना कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न सुरु होता हे स्पष्ट झालं आहे. यांना आपला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे. पण त्यासाठी संभाजीराजेंची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही असून प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करुन अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचंदेखील सर्व घडामोडींवर लक्ष आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, भाजपाने तिसरा उमेदवार रिगणात उतरविल्याने शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असेल. तिसऱ्या जागेसाठी भाजपाने रात्री उशिरा कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. भाजपाचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत.