मुंबई : भारत संग्रहालयांच्या याबाबतीत काही प्रमाणात दुर्दैवी आहे. सर्वात जुनी सिंधू नागरी संस्कृती भारताला लाभली आहे. सुमारे १० हजार वर्षांपूर्वीची विकसित अवस्थेतील हडप्पा, मोहेंजोदाडो, राखीगढी आदी शहरे याची उत्तम उदाहरणे आहेत. मात्र, आक्रमणांमुळे व अनास्थेमुळे आपण ऐतिहासिक वारशाचे जतन करू शकलो नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आवारातील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी या संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.कुठल्याही शहराची श्रीमंती तेथील सधन वस्त्या, उंच इमारती, मोठे रस्ते यावरून ठरत नाही तर संग्रहालयांवरून अधोरेखित होते. जगातील सर्व उत्तम शहरांत उत्तम संग्रहालये आहेत. शहराची संस्कृती आणि इतिहास यांचा ठेवा संग्रहालयाच्या रुपाने उभा असतो. शहराची जडणघडण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संग्रहालये महत्वाची भूमिका बजावतात. डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातले सर्वात जुने आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे जुने संग्रहालय आहे. भारत देश नागरी संस्कृतीची खाण असून ज्या ठिकाणी उत्खनन करू तेथे नवीन नागरी संस्कृती आढळेल, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे संग्रहालयांबाबत जागरुकता वाढणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.
u
यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, महानगरपालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, चंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – ‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
सहा भागांमध्ये संग्रहालयाची रचना
या संग्रहालयात विज्ञान, कला व अध्यात्म यांचा संगम आढळून येतो. मातीची लघुशिल्पे, नकाशे, पाषाणावर केलेली मुद्रांकने , छायाचित्रे, दुर्मीळ पुस्तके आदी आकर्षणाचे केंद्र ठरणारी आहेत. सहा विविध भागांमध्ये संग्रहालयाची रचना करण्यात आलेली असून मुंबईचा इतिहास, औद्योगिक, कला, १९ व्या शतकातील चित्रे, संस्थापकांची दर्शनिका, कमलनयन बजाज मुंबई दर्शनिका आणि कमलनयन विशेष प्रदर्शन दर्शनिका यांचा या रचनेत समावेश आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी २ कोटी ८० लाख रुपये खर्च झाला. गेल्यावर्षी नूतनीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर १८ महिन्यांत काम पूर्ण करून संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे.