Devendra Fadnavis on Ashish Shelar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (२४ मार्च) मुंबई येथे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना एक गंमतीदार वक्तव्य केलं आणि त्यानंतर एकच हशा पिकला. फडणवीस यावेळी म्हणाले, “आशिष शेलार माझ्याव्यतिरिक्त कोणालाच छळत नाहीत. पण त्यांचा छळ हा प्रेमाचा छळ असतो.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रवीण दरेकर यांच्या या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहे. मात्र, मी इथे गंभीर भाषण करावं असं अनेकांना वाटतं. मात्र, मी गंभीर भाषण करावं असं अपेक्षित नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आशिष शेलार माझ्याव्यतिरिक्त कोणाचाच छळ करत नाहीत. ते प्रेमाचा छळ करतात. त्या छाळात कुठलाही छळ नसतो, केवळ प्रेम असतं. आज त्यांचं सगळं प्रेम या ठिकाणी ओसंडून वाहतंय, याचा मला अतिशय आनंद होत आहे.”
फडणवीसांकडून दरेकरांचं कौतुक
दरम्यान, प्रवीण दरेकरांचं कौतुक करत फडणवीस म्हणाले, “दरेकर यांनी संपूर्ण सामाजिक, राजकीय जीवनात मेहनतीने व कष्टाने स्वतःचं नेतृत्व, स्वतःची प्रतिमा उभी केली आहे.”
या कार्यक्रमाला फडणवीस यांच्याव्यतिरिक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे की राज ठाकरे, दोन भावांपैकी आवडते ठाकरे कोण? फडणवीस म्हणाले…
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत आणखी एक गंमतीदार वक्तव्य केलं आहे. फडणवीसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. अनेक वर्षांपासूनची शिवसेना (उद्धव ठाकरे) व भाजपाची युती तुटली आहे. तर, राज ठाकरेंशी फडणवीसांचे खूप चांगले संबंध आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यापैकी कोणते ठाकरे जास्त आवडते आहेत? त्यावर फडणवीस म्हणाले, “ठाकरे असे आहेत की त्यांना आपण लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं.. कुठे भानगडीत पडता?”