गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरध्वनी टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रविवारी पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याचं पहायला मिळालं.  राज्य सरकारचे गैरव्यवहार बाहेर काढल्यानेच चौकशी करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला़  मात्र, कायद्यापुढे सर्व समान असताना हा तमाशा कशाला, असा सवाल शिवसेनेने केला. देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चौकशीदरम्यान काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली. मात्र एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्याच गाजलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याचा संदर्भ देणारा उल्लेख केला आणि सभागृहामधील सर्वांच्याच चेहऱ्यावर जोरदार हसू दिसून आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीसांनी केले गंभीर आरोप…
शुक्ला यांचा गोपनीय अहवाल उघड करून गोपनीयतेच्या कायद्याच्या भंगाबद्दल सायबर पोलिसांनी रविवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. चौकशीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील प्रचंड गैरव्यवहार आणि अन्य प्रकरणे उघड करीत असल्याने दबाव आणण्यासाठी माझी पोलीस चौकशी करण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरध्वनी टॅिपग प्रकरणी मला आरोपी किंवा सहआरोपीही केले जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

अन् फडणवीसांनी केला ‘पुन्हा येईन’चा उल्लेख
या पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडून झाल्यानंतर फडणवीस यांना पत्रकरांनी प्रश्न विचारले. यावेळी एका महिला पत्रकाराने, “आजच्या चौकशीनंतर पोलिसांचं समाधान झालं आहे का? की त्यांनी पुन्हा चौकशीसाठी तुम्हाला बोलवू किंवा येऊ असं काही सांगितलंय का?” असा प्रश्न विचारला. फडणवीस यांनी संपूर्ण प्रश्न ऐकून घेतल्यानंतर, “आज मला पुन्हा येईन असं त्यांनी (पोलिसांनी) सांगितलेलं नाही,” असं उत्तर दिलं अन् सभागृहामध्ये फडणवीसांसोबत उपस्थित असणाऱ्या नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत सर्वचजण हसू लागले.

तो अहवाल मी बाहेर काढला
‘‘राज्य सरकारने शुक्ला यांचा अहवाल दाबून ठेवला होता. तो मी बाहेर काढला, पण जनतेसमोर खुला केला नाही. राज्य सरकार, उच्चपदस्थ तसेच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी गैरव्यवहारात सामील असल्याने अहवाल असलेला पेनड्राईव्ह आणि अन्य कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांकडे सोपवली. त्याआधारे उच्च न्यायालयाने सीबीआयकडे चौकशी सोपवली असून, त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर कारवाई झाली असून, तपास सुरू आहे. मी गैरव्यवहार उघड केला, त्याच दिवशी अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत अहवालाची कागदपत्रे पत्रकारांना दिली, मी ती उघड केली नव्हती. अहवाल गोपनीय होता, तर मंत्र्यांनी कागदपत्रे कशी दिली’’, असा सवाल फडणवीस यांनी केला.

प्रश्नावली वेगळी होती
‘‘पोलिसांनी पूर्वी पाठविलेली प्रश्नावली वेगळी होती आणि आजच्या चौकशीत मीच गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन केले, मोठी चूक केली, अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आल़े  विरोधकांना नामोहरम करण्यासाठी खोटय़ा गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे काम सत्ताधारी नेते करीत असल्याचे मी नुकतेच विधानसभेत उघड केले. मंत्र्यांचे दाऊद इब्राहिमसह इतरांशी असलेले लागेबांधे व अन्यही गैरव्यवहार काढले. त्यामुळे माझ्यावर दबाव आणण्यासाठी आता चौकशीचा रोख बदलण्यात आला आहे. मला गोपनीय अहवाल फोडल्याच्या कारणास्तव आरोपी बनविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने प्रश्न विचारण्यात आले. मी बदल्यांमधील गैरव्यवहार काढला नसता, तर तो अहवाल दाबून टाकण्यात आला असता’’, असे फडणवीस म्हणाल़े ‘‘मी माहिती कशी मिळविली, याचा स्त्रोत उघड न करण्याचा मला विशेषाधिकार आहे. तरीही तो न वापरता पोलिसांपुढे चौकशीसाठी जाण्याचे मी शनिवारी जाहीर केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणे चौकशीला घाबरत नाही आणि तपास यंत्रणांवर आरोपही करीत नाही’’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

भाजपाचे राज्यभरात शक्तीप्रदर्शन
फडणवीस यांच्या पोलीस चौकशीविरोधात भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करीत शक्तिप्रदर्शन केले. आता विधिमंडळात गैरव्यवहाराची आणखी प्रकरणे उघड होतील व बॉम्ब फुटतील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. नागपूरमध्ये सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सुधीर मुनगंटीवार, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले होते. चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आदी ठिकाणी पोलिसांच्या नोटीसची होळी करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis says police havent said they will come again for inquiry referring to his famous me punha yein comment scsg