हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी इतर धर्मांतील तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिष देऊन कोणीही कोणाचं धर्मांतरण होत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अहमदनगरमध्ये झालेल्या प्रकरणात पोलीस अधिकारी सानप यांना निलंबित केलं असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“नितेश राणे यांनी मांडलेला मुद्दा अतिशय गंभीर आहे. आपल्याकडे धर्मांतराबाबत कायदा आहे. जबरदस्तीने किंवा आमिष देऊन कोणीही कोणाचं धर्मांतरण करू शकत नाही, याबाबत कायद्यात तरतुदी आहेत. जर यात काही त्रुटी असतील तर यात सुधारणा करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“पीडिता ही अल्पवयीन असताना आरोपी इम्रान कुरेशी याने तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार होऊनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणीतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सानप यांचे आरोपीबरोबर काही संबंध आहेत का? याचीही तपासणी करण्यात येत आहे, जर असे काही संबंध निघालेत, तर सानप यांच्यावरही कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल”, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – “टोलनाके हद्दपार होणार”, टोलवसूलीसाठी नितीन गडकरींनी सांगितली ‘ही’ नवी योजना

नितेश राणेंनी काय आरोप केलेत?

हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला. “अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच आरोपीला पकडलं जात नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला स्थानिक जेलमध्ये बंद केलं आहे. सेंट्रल जेलमध्ये पाठवलेलं नाही,” असं नितेश राणे म्हणाले होते.

“सानप नावाच्या अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा आहे. आरोपीला घरचं जेवण दिलं जात असून, इतर मदतही केली जात आहे. हा महाराष्ट्रासाठी गंभीर विषय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवलं जातं आणि त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते,” असा आरोप नितेश राणेंनी केला होता.

Story img Loader