मुंबई : पैशांसाठी गर्भवतीवर उपचार करण्याचे टाळून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने असंवेदनशीलतेचे दर्शन घडविल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली. मंगेशकर रुग्णालयातील या प्रकरणाच्या चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच भविष्यात धर्मदाय रुग्णालयांमध्ये असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने सरकार नियंत्रण आणणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तनिषा भिसे या गर्भवतीकडे अनामत रक्कम जमा करण्याची मागणी करीत रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे या महिलेला उपचाराअभावी प्राण गमवावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार व्हायला हवे होते. मुख्यमंत्री वैद्याकीय कक्षातूनही रुग्णालयाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र रुग्णालय प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही.

यातून मंगेशकर रुग्णालयाची असंवेदनशीलचा दिसून येत असल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. मंगेशकर रुग्णालयासह राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालये त्यांची जबाबदारी पार पाडतात का याबाबतही समिती चौकशी करणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने झालेल्या महिलेच्या मृत्यूची दखल शासनाने घेतली आहे. ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याची सूचना मी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपचार घेणे हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात नेमकी काय चूक झाली आहे, याची तपासणी केली जाईल. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी चूक केली असेल, तर या चुकीला माफी नाही. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

अद्यायावत सुविधा असलेल्या रुग्णालयात पैशांअभावी त्या नाकारल्या जाणे ही गंभीर बाब आहे. प्रसूतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यू होऊ नये, असे आरोग्यसेवेचे धोरण असायला हवे. शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

याप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. रुग्णालयाचे आणि संबंधित कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री