मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाल्याने आता डहाणूजवळील वाढवण हे देशातील सर्वाधिक मोठे बंदर विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार असून त्यामुळे राज्याचा सर्वसमावेशक विकास साध्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. मच्छीमारांच्या सर्व समस्यांचेही निराकरण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांच्या धर्तीवर उद्योग क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या उद्योगपती आणि उद्योजकांना उद्योग विभागातर्फे ‘उद्योगरत्न’ आणि विविध पुरस्कारांनी राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा प्रकृती अस्वास्थ्यामुळे समारंभास उपस्थित राहू शकणार नसल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिंदे यांनी शनिवारी पुरस्कार प्रदान केला होता. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी टाटांच्या वतीने रविवारी प्रातिनिधिक पुरस्कार स्वीकारला. ‘सिरम इन्स्टिटय़ूट’चे आदर पूनावाला यांना उद्योगमित्र, किर्लोस्कर समूहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी, तर नाशिकच्या ‘सह्याद्री’ फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांना उत्कृष्ठ मराठी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, की सध्या देशातील सुमारे ६५ टक्के कंटेनर वाहतूक ही जेएनपीटी बंदरातून केली जाते. वाढवण बंदराची क्षमता त्याच्या तिप्पट असून मोठय़ा जहाजांसाठी आवश्यक अशी समुद्राची सर्वाधिक खोली (शॅफ्ट) वाढवण बंदरात उपलब्ध आहे.
राज्य सरकारने उद्योगपतींचे सल्लागार मंडळ स्थापन केले असून त्या माध्यमातून उद्योगपूरक केंद्र (इंडस्ट्री फॅसिलिटेशन सेंटर) तयार करण्यात येत आहे. सर्व आवश्यक मंजुऱ्या एक खिडकी योजनेतूून मिळतील. देशातील सर्वाधिक देशी-विदेशी गुंतवणूक, निर्मिती उत्पादन, युनिकॉर्प, स्टार्टअप्स आदी सर्वच बाबींमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे प्रचंड सामाजिक भान असलेले हिमालयासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व असून अतिशय नम्र आणि विनयशील आहेत, हा देवमाणूसच आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग पुरस्कारांचे वितरण करताना काढले. राज्य सरकारने दाव्होस येथे केलेल्या सामंजस्य करारांपैकी ८० टक्के करारांची अंमलबजावणी झालेली आहे व प्रत्यक्ष गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्राला आता उद्योगांची मोठी पसंती असून गुंतवणुकीचा ओघ पुढील काळात वाढतच जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. देशातील संगणक क्रांतीचे जनक असलेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जयंतीनिमित्ताने स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्योगक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देण्याची कल्पना गेल्या ६० वर्षांत कोणत्याही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना किंवा इतरांना का सुचली नाही? त्यात माझाही दोष आहे, असे पवार यांनी नमूद केले. राज्य सरकारने दाव्होस येथे एक लाख ३७ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले होते आणि त्यापैकी ७७ टक्के म्हणजे एक लाख सहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी देकारपत्रे देण्यात आली आहेत, असे सांगून उद्योगमंत्री सामंत यांनी टाटा समूहाला जागतिक दर्जाचे ऑटोमोबाईल आणि विविध क्षेत्रांबाबतचे वस्तुसंग्रहालय उभारण्याचे आवाहन केले. टाटा समूहाचे चंद्रशेखरन यांनी आपल्या भाषणात त्यास सहमती दर्शविली. या समारंभात ‘यूआर मित्रा’ या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वाढवणची वैशिष्टय़े
’वाढवण बंदराची उभारणी समुद्रकिनाऱ्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होणार असून या ठिकाणी किमान १८ मीटर खोली मिळणे अपेक्षित आहे. देशातील सर्वाधिक खोलीचे हे बंदर असेल.
’देशात मोठी जहाजे नांगरण्याची सुविधा सध्या उपलब्ध नसल्याने श्रीलंका किंवा अन्य ठिकाणी कंटेनर उतरवून भारतात आणावे लागतात.
’वाढवणला बंदर कार्यान्वित झाल्यानंतर आयात-निर्यातीमध्ये मोठय़ा प्रमाणात वृद्धीची होण्याची शक्यता आहे.
’या ठिकाणी नियमित गाळ काढण्याची आवश्यकता भासणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे.
’बंदरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग व समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.