पुण्यातील पोटनिवडणुकीने राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादीने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. यात फडणवीसांनी गिरीश बापट यांनी कसब्याचा गड मजबूत केल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद आणि भाजपाची ओळख आहे. देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः! गिरीश बापट यांनी कसब्याचा गड मजबूत केला. इथल्या मनामनांत त्यांनी भाजपाचे कमळ रुजवले. मतदारराजा त्यांचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही!”
फडणवीसांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत गिरीश बापट म्हणत आहेत, “आपला पक्ष अनेक निवडणुका लढला. कधी जिंकलो, तर कधी हरलो. मात्र, पक्षाची संघटना मजबूत राहिली. ही निवडणूक चुरशीची वगैरे काही नाही हे लक्षात ठेवा. आपला उमेदवार चांगल्या मतांनी जिंकणार आहे. हेमंत रासने यांचं काम चांगलं आहे. आपला विजय नक्की आहे, काळजी करू नका. निवडून आल्यावर पुन्हा पेढे द्यायला मीच तुमच्याकडे पुन्हा येईल.”
व्हिडीओ पाहा :
दरम्यान, गिरीश बापट यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी असताना आणि हाताला ऑक्सिमीटर लावण्यात आले असताना त्यांना भाजपा प्रचारासाठी त्यांना वापरत आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. “प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे, अशी टीका जगताप यांनी केली. तसेच गेल्या पाच वर्षात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत गिरीश बापट यांचा समावेश करण्यात आला नाही, पण आता कसबा निवडणुकीच्या वेळी बापटांची भाजपाच्या नेतृत्वाला आठवण आली,” अशी टीका जगताप यांनी केली.
एक व्हिडीओ जारी करत प्रशांत जगताप म्हणाले, “कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट प्रचारासाठी उतरले आहेत. मुळात गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली.”
हेही वाचा- ‘श्वास घ्यायला त्रास अन् नाकात ऑक्सिजन नळी’, भाजपाच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट मैदानात
“मागील पाच वर्षापासून भाजपाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतून गिरीश बापट यांना बाजुला का ठेवण्यात आलं? भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमात, मेळाव्यात गिरीश बापट यांचा साधा फोटो लावण्याचं औदार्यही भाजपाने दाखवलं नाही. पण आज कसबा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार अडचणीत आल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला गिरीश बापट यांची आठवण झाली. हे एकूणच भाजपाच्या पराभवाचं लक्षण आहे. गिरीश बापट यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. हे पुणेकर कधीही विसरणार नाहीत,” अशी टीका जगताप यांनी केली.