मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून सर्वसामान्यांचे जनजीवन ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडून परिस्थितीची माहिती करून घेतली. मुंबई महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत. याची माहिती फडणवीस यांनी घेतली.
मुंबईच्या समुद्रात दुपारनंतर उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे लोकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि सरकारकडून देण्यात येणाऱया सूचना पाहून मगच घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर तरुणांनी समुद्र किनारी जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले. दर दोन तासांनी सरकारकडून मुंबईतील पावसाबद्दल आणि तेथील परिस्थितीबद्दल माहिती देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईतील पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे फडणवीस यांनी त्यांचा नियोजित कोल्हापूर दौरा शुक्रवारी रद्द केला.

Story img Loader