मुंबई : जपानी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम संधी असून विदेशी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर आकर्षित करणारे हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधील टोकियो आणि क्योटो येथे जपानी उद्योगपती आणि विविध कंपन्यांच्या उच्चपदस्थांशी बोलताना सोमवारी केले. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यावर जपानची उड्डाणे वाढविली जातील आणि त्याचा ओसाका या जपानच्या आर्थिक राजधानीतील भारतीयांना अधिक उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून पाच दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी फडणवीस यांचे टोकियो येथे सोमवारी आगमन झाल्यावर तेथील मराठी बांधवांनी पारंपरिक वेशात त्यांचे स्वागत केले. ‘तेव्हा मी जपानमध्ये नाही, तर मुंबई किंवा पुण्यात आल्यासारखे वाटत आहे. तुम्ही मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा गौरव हा सातासमुद्रापलीकडे जिवंत ठेवला आहे’, अशा भावना फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या. टोकियोमध्ये गेल्यावर्षीपासून शिवजयंती साजरी होत असून पालखी व अन्य बाबींसाठी जपान सरकारही सहकार्य करीत आहे. तेव्हा तेथील मराठी बांधवांना राज्य सरकारही आवश्यक मदत करील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. टोकियो विमानतळावर जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.

 फडणवीस यांनी टोकियोतील इंडिया हाऊसमध्ये उद्योजकांशी चर्चा केली. अधिकाधिक जपानी कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, जपानमधील मराठी उद्योजकांना कोणते सहकार्य देता येईल आणि मराठी विद्यार्थ्यांना जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी कशा उपलब्ध होतील, आदींविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी जपानमधील शिनकानसेन बुलेट ट्रेनने क्योटो या प्राचीन राजधानीच्या शहरापर्यंतचा प्रवास केला. क्योटो येथे भारतीय वाणिज्य दूत निखिलेश गिरी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. वाकायामा प्रिफेक्चरचे आंतरराष्ट्रीय कामकाज संचालक योशियो यामाशिता तसेच ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान’चे अध्यक्ष समीर खाले आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी क्योटो, ओसाका आणि कांसाई क्षेत्रातील सुरेश लाल, राम कलानी, भावेन जव्हेरी, गुरमित सिंग, श्यामसिंग राजपुरोहित, सत्येन बंडोपाध्याय, शितोरु रॉय, सुरेश नरसिंहन, माकी केईजी, मोहन गुलराजानी, दीपक दातवानी, अजयकुमार नामा आदी आघाडीच्या उद्योजकांशी क्योटो येथे चर्चा केली. जपानच्या उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अनेक उत्तम संधी आहेत. महाराष्ट्र आणि वाकायामा या दोन प्रांतात अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी बोलताना नमूद केले. फडणवीस यांनी क्योटो येथे किंकाकूजी झेन बौद्ध मंदिरात (गोल्डन पॅव्हेलियन) दर्शन घेतले. हे जागतिक वारसा स्थळ असून उत्तम कलाकृतीचा नमुना आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis welcomed in japan in a maharastrian culture ysh
Show comments