भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. नवी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून राजधानीमध्ये बैठका सुरू होत्या. बुधवारीच पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. 
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले फडणवीस यांचे नाव अचानक शर्यतीत आल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले होते. राज्य भाजपमध्ये गडकरी-मुंडे यांच्यातील संघर्ष लपून राहिलेला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर स्वत:च्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्नशील होते. गडकरींना शह देण्यासाठी मुंडे यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला होता. अखेर फडणवीस यांच्या निवडीमुळे मुंडे गटाची सरशी झाल्याचे दिसते.