‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’..म्हणत आजही शरद पवारसाहेब पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात असले तरी देशातील जनताच काँग्रेस-राष्ट्रवादीला विटली असून नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने पाहात आहेत.
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
नेमकी याचीच भीती शरद पवार आणि काँग्रेसला वाटत असल्यामुळे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सातत्याने मोदींवर टीका केली जात आहे, अशी बोचरी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मोदी यांची ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ अशा शब्दात पवार यांनी खिल्ली उडवली. पवार यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना, काही नवरे आता बाशिंग बांधून थकले असले तरी पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर चढण्यासाठी उतावळे असल्याची टीका फडणवीस यांनी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीचे बोलके पोपट आर.आर. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांना पंतप्रधानपदाचे दावेदार बनवून टाकले होते. त्याच्या परिणामी त्यांच्या लोकसभेतील जागा घटल्या, अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली. ‘संगीत शारदा’ या नाटकातील ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ या पात्राप्रमाणेच सगळेच आपल्यासारखेच गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ असल्याचे स्वप्न पवार यांना पडत असावे असा टोला त्यांनी लगावला.
मराठय़ांच्या इतिहासातील कथेत ज्याप्रमाणे घोडे पाणी प्यायला बुजले की मुघल सैनिक पाण्यात संताजी-धनाजी दिसतो का, असे विचारीत त्याप्रमाणे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जळी-स्थळी मोदी दिसत आहेत. महाराष्ट्रात लकवा मारलेल्या हातावर ‘घडय़ाळ’ बांधून मिरविणाऱ्या राष्ट्रवादीने हिम्मत असेल तर लकवा मारलेल्या ‘हाता’ला झिडकारून दाखवावे, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. लाखो कोटींचे भ्रष्टाचार करणारे मंत्री व वाढती महागाई यांनी जनता त्रस्त झाली असून हातातील सत्ता जाणार हे दिसत असल्यामुळेच जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्याच्या नावाखाली संधी मिळेल तेथे नरेंद्र मोदींवर टीका केली जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा