भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलल्यानंतर प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची चिन्हे असून नागपुरातील आमदार देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला चैतन्य व यश देण्यासाठी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनाही अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी गळ घातली जात असली तरी ते या पदासाठी उत्सुक नाहीत. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही अजून कोणाचेही नाव न सुचविल्याने आणि कोणत्याही नावावर सहमती न झाल्याने भाजपच्या कोअर समितीची बुधवारी होणारी बैठक आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गडकरी यांची फेरनिवड झाली असती, तर प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांचीच फेरनिवड होण्याची दाट शक्यता होती. पण आता गडकरी यांना पद सोडावे लागल्याने प्रदेशाध्यक्षही बदलावा, असे काही नेत्यांचे मत आहे. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तोंड देऊ शकेल आणि आक्रमकपणे सामोरा जाईल, असा तरूण नेता निवडला जाणार आहे. गडकरी जर पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, तर नागपूरमधील एक ब्राह्मण नेता प्रदेशाध्यक्ष करण्यात पक्षाची अडचण होती. पण आता हा अडथळाही राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हे आक्रमक असून विविध विषयांचा त्यांचा अभ्यासही चांगला असतो. विशेष म्हणजे, त्यांच्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत किंवा त्यांनी पक्षातील कोणालाही दुखावलेलेही नाही. उलट, राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे वैधानिक मार्गानी प्रकाशात आणून फडणवीस यांनी विरोधी पक्षाची भूमिका योग्य रीतीने वठविल्याचे पक्षातील अनेकांचे मत आहे. त्यामुळे पक्षाच्या कोअर समितीतील नेत्यांमध्ये त्यांच्या नावाबाबत दुमत होण्याची शक्यताच नाही असे एका नेत्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा