राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मोठे बदल केल्याचा आव पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणला असला तरी असे बदल म्हणजे राष्ट्रवादाला नव्हे तर भ्रष्टवादालाच खतपाणी आहे, अशी तोफ डागून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी थेट थोरल्या पवारांनाच अंगावर घेतले आहे. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ाला धूर्तपणे बगल देऊन या गंभीर समस्येवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच राजीनामे आणि फेरबदलाचे अनावश्यक नाटय़ राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी रचले असले तरी त्यातून जनतेचे काहीच भले होणार नाही असा टोलाही फडणवीस यांनी मारला आहे.
राज्यमंत्री असताना जाधव यांनी मुलांच्या लग्नात कोटय़वधींचा खर्च केल्याच्या वृत्ताने आपल्याला रात्रभर झोप आली नव्हती असे पवार यांनी तेव्हा सांगितले होते. तरीही आता त्याच जाधव यांना आणि अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना पवार यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष केले आहे. आता तर त्यांची झोप कायमची उडेल, अशी आपल्याला भीती आहे, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना फडणवीस म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या नेमणुकीमुळे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नाराज असल्यामुळेच, पक्षाचे अध्यक्ष हे माझ्यासह सर्वाचे नेते आहेत अशा शब्दांत नाराजांना समज देण्याची वेळ पवार यांच्यावर आली. जाधव व आव्हाड यांच्यातील सख्य तर जगजाहीर असून या बोलक्या पोपटटांमुळे राष्ट्रवादीच्या अडचणींमध्येच भर पडेल असेही भाकित फडणवीस यांनी
वर्तविले.
मंत्र्यांचे राजीनामे घेऊन भ्रष्ट मंत्र्यांची उचलबांगडी करण्याचा आव शरद पवार यांनी आणला होता. प्रत्यक्षात छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांच्यासह भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या बडय़ा मंत्र्यांना हात लावण्याची हिम्मत पवार दाखवू शकले नाहीत. सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाल्यानंतरही अवघा एक टक्का जमीन सिंचनाखाली हे शासनाचाच अहवाल म्हणतो.
ज्या जलसिंचन खात्याने ही कमाल केली त्याचे नऊ वर्षे मंत्री असलेल्या अजित पवार यांना साधा जाब विचारावा असे पवार यांना का वाटले नाही, असा सवाल करून, जनता दुष्काळाने होरपळत असताना बेताल वक्तव्ये करणाऱ्या अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे पवारांनी चातुर्याने टाळल्याचे फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादी नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’!
राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मोठे बदल केल्याचा आव पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणला असला तरी असे बदल म्हणजे राष्ट्रवादाला नव्हे तर भ्रष्टवादालाच खतपाणी आहे, अशी तोफ डागून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी थेट थोरल्या पवारांनाच अंगावर घेतले आहे.
First published on: 19-06-2013 at 04:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra phadnis made allegation on sharad pawar over corruption