‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत धुडघूस घातल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मंडळाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी काही दिवस आधी गणेश कार्यशाळेतून वाजतगाजत ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ची आगमन मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. या मिरवणुकीच्या निमित्ताने केवळ चिंचपोकळी भागातीलच नव्हे तर पूर्व-पश्चिम उपनगरे आणि लगतच्या शहरांमधील नागरिक चिंचपोकळीत दाखल होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी हुल्लडबाजांनी मिरवणुकीत गोंधळ घालत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. आगमन मिरवणुकीत हुल्लडबाजांनी महिलांची छेडछाड केली, पाण्याच्या बाटल्या-चप्पल मिरवणुकीत सहभागी आणि बघ्यांच्या दिशेने भिरकावून उपद्रव केला. मात्र प्रचंड गर्दीमुळे पोलिसही हतबल झाले होते. आता याच मंडळाच्या पाच-सहा कार्यकर्त्यांनी ‘चिंतामणी’चे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची चित्रफित शनिवारी समाजमाध्यमांवर दिसू लागली आहे. मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळच हा प्रकार घडला.

हेही वाचा >>> मुंबई पारबंदर प्रकल्पातील ८४ टक्के काम पूर्ण

दोन वर्षांनंतर ‘चिंतामणी’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तासंतास रांगेत उभे राहून भाविक गणपतीचे दर्शन घेत आहेत. मात्र या गर्दीत भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांची अरेरावी सहन करावी लागत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे शनिवार ‘चिंतामणी’चे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक चिंचपोकळीत दाखल झाले होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंडपाच्या प्रवेशद्वारावर रस्ता रोधक उभे केले होते. भाविकांच्या गर्दीचा लोंढा आला आणि रस्ता रोधक जागेवरून दूर झाले. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामुळे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अद्याप कोणाचीही तक्रार नाही
या घटनेत मारहाण झालेली व्यक्ती, दागिने चोरण्याचा प्रयत्न झाल्याबाबत महिला वा मंडळाने पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असे काळाचौकी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन लालबाग, चिंचपोकळी भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच चिंचपोकळी परिसरातही पोलिसांची गस्त सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दोन वर्षांनी गिरणगावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला आणि लहान मुले यांच्यासाठी विशेष रांगेची व्यवस्था केली होती. मात्र, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शनिवारी रात्री प्रचंड गर्दीमुळे एका व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा आणि तिच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित काही नागरिकांनी त्याला मारहाण केली. गर्दीचा फायदा घेऊन ती व्यक्ती पसार झाली आणि महिलाही निघून गेली. विभागीय पोलिसांच्या समन्वयाने मंडळ त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. – विद्याधर घाडी, अध्यक्ष, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

Story img Loader