लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास आतड्यांमधील कृमी दोष कारणीभूत ठरत आहे. यामुळे मुला-मुलींच्या पुढील आयुष्यावर याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे राज्यामध्ये ४ डिसेंबर रोजी असलेल्या राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यातील सुमारे १ कोटी ४८ लाख मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.

कृमी दोष असलेले विद्यार्थी वारंवार आजारी पडतात, त्यांना लवकर थकवा येतो व ते अभ्यासात लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तिक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दूषित मातीद्वारे फार सहजतेने होतो. त्यामुळे महाराष्ट्रात २०१५ पासून राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येतो. ऑगस्ट २०१६ पासून हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा राबविण्यात येत आहे. यापूर्वी १ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशक औषध देण्यात येत होते. परंतु २०१५ पासून कार्यक्रमाचा विस्तार करून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलांचा व किशोरवयीन मुलांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबईत आज हलक्या सरींचा अंदाज

त्यानुसार सर्व मुला-मुलींना शाळा, महाविद्यालये व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यभरामध्ये ४ डिसेंबर २०२४ रोजी ५६ हजार ७ अंगणवाडी केंद्रे, ५५ हजार १०२ शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून १ ते १९ वर्ष वयोगटातील सुमारे १ कोटी ४८ लाख मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. १ ते २ वर्ष वयोगटातील बालकांना २०० मिलिग्रॅम अल्बेंडाझोलची अर्धी गोळी, २ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना ४०० मिलिग्रॅम अल्बेंडाझोलची १ गोळी, तसेच ६ ते १९ वर्ष वयोगटातील मुले व मलींना ४०० मिलिग्रॅम अल्बेंडाझोलची १ गोळी देण्यात येणार आहे.

जंतनाशक गोळीनंतर किरकोळ त्रास

ही गोळी घेतल्यानंतर काही मुलांना किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. चक्कर येणे, उलटी, मळमळ, डोके दुखी असा त्रास होण्याची शक्यता आहे. या गोळीचा मुलांच्या शरीरातील जंतांवर होत असलेल्या परिणामामुळे असा त्रास होतो. मात्र हा त्रास काही वेळानंतर कमी होतो.

आणखी वाचा-“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया

शंका दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक

बालके आधीच आजारी असल्यास त्यांना जंतनाशक गोळी देण्यात येत नाही. अशा बालकांना मॉप अप दिनी म्हणजे १० डिसेंबर रोजी गोळी देण्यात येणार आहे. गोळी दिल्यानंतर काही विपरित परिणाम आढळल्यास किंवा काही शंका असल्यास शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती, संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी यांचा आरोग्य सल्ला घेऊ शकतात. तसेच आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क करू शकतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deworming campaign to be implemented in state deworming tablets to be given to 1 5 crore children mumbai print news mrj