विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या कामकाजादरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सभागृहामध्ये प्रस्ताव मांडत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. मात्र हा व्हिडीओ जयंत पाटील यांच्या मागे बसलेले राष्ट्रवादीचे नेते आणि समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे चर्चेत आहे.
झालं असं की, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे चार वर्षांचे वित्तीय अहवाल जयंत पाटील यांनी सादर केले. मात्र हे अहवाल मांडत असताना जयंत पाटलांच्या मागे बसलेले धनंजय मुंडे समोर बसलेल्या कोणाला तरी बॉम्ब कुठे आहेत? असं हातवारे करुन विचारताना दिसत आहेत. यावेळी ते गोल गोल हात फिरवत बॉम्ब, हात वर करुन स्फोट असे हावभाव करुन संवाद साधताना दिसताय. नंतर ते स्वत:चे दंड थोपटून “इथे आहेत,” असं म्हणतानाची दृष्यं कॅमेरात कैद झालीयत.
बॉम्ब प्रकरण काय?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांविरोधात खोटे गुन्हे रचून त्यांना अडकवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जातोय असे गंभीर आरोप केले होते. हे आरोप करताना पुरावा म्हणून फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेनड्राइव्ह आणि व्हिडीओ सादर केले. फडणवीसांच्या या व्हिडीओ बॉम्बनंतर राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लवकरच दुसरा बॉम्ब फुटेल असा सुचक इशारा दिला होता.
उद्या किंवा परवा आणखी एक व्हिडीओ बॉम्ब येणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. याचसंदर्भात धनंजय मुंडे चौकशी करत असल्याचा चर्चा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर होऊ लागल्यात. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो असं सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्रँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजपा तसेच जनता आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. आता धनंजय मुंडे याच बॉम्बची चौकशी नेमकी कोणाकडे करत होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.