मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील नातेसंबंध हे सकृतदर्शनी विवाहाच्या व्याख्येत मोडणारे आहे. त्यामुळे, घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत करुणा यांना दिलासा मिळण्याचा अधिकार असल्याचे माझगाव येथील सत्र न्यायालयाने सविस्तर आदेशात स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवला होता. तसेच, धनंजय मुंडे यांचे अपील फेटाळून लावले होते.

मुंडे यांचे अपील फेटाळण्याचा माझगाव सत्र न्यायालयाचा आदेश मंगळवारी उपलब्ध झाला. त्यात, करुणा यांच्याशी कधीही लग्न झाले नव्हते, असा दावा मुंडे यांनी केला होता. तथापि, मुंडे यांचे करुणा यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाचे स्वरूप लग्नाच्या व्याख्येत मोडणारे आहे.

शिवाय, दोघांना दोन मुले असून एकत्र राहिल्याशिवाय हे शक्य नाही, असेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी सविस्तर आदेशात नमूद केले.

दोन कागदपत्रांतून नात्याला पुष्टी

करुणा आपली पत्नी नाही किंवा तिच्यासह आपण लिव्ह-इन संबंधातही नव्हतो, असा दावा मुंडे यांनी केला होता. परंतु, मुंडे यांचे इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र हे सकृतदर्शनी करुणा आणि मुंडे यांच्यातील विवाहाचे नातेच दर्शवतात, असे न्यायालयाने म्हटले.