महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी नेत्यांच्या ‘राज’भेटीचे सत्र अजूनही सुरूच आहे. आज(शुक्रवार) राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या या अचानक झालेल्या ‘राज’भेटीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनंजय मुंडे आणि राज यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कृष्णकुंजला एक वेगळेच राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. राजकीय नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून कृष्णकुंजवर येर-झाऱया सुरू आहेत. याआधी भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची गुप्तभेट घेतली होती. त्यामुळे महायुतीत नाराजीचे महावादळही उठले होते. त्यानंतर कोल्हापूरचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, शेकाप नेते जयंत पाटील आणि नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनीही कृष्णकुंजवर हजेरी लावून राजभेट घेतली होती. या भेटीनंतर काही दिवसांत मावळ आणि रायगडमध्ये मनसे लोकसभेसाठी शेकापला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर झाले. आता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रातील मातब्बरांचे डोळे वटारले आहेत.  

Story img Loader