विधानसभा अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्याने सातत्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावलं आहे. आजही ( २० मार्च ) पुरवणी मागणीवर चर्चा सुरू असताना मंत्री उपस्थित नव्हते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले. तेव्हा मुंडे आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात खडाजंगी झाली.
नेमकं काय घडलं?
विधानसभेत कृषी, महसूल आणि अन्य विभागांवर चर्चा होणार होती. पण, त्या विभागाचे मंत्री हजर नसल्याने धनंजय मुंडे संतापले. “आज कृषी, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, महसूल विभागावर चर्चा होणार आहे. मग, या सर्व विभागेच मंत्री सदनात असायला हवेत. फक्त कृषी आणि वैद्यकीय शिक्षक याव्यतिरिक्त कोणताही मंत्री सदनात दिसून येत नाहीत.”
“अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, मागण्यांवर चर्चा सुरु आहे. तरी, मंत्री अनुपस्थित आहेत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. सरकार एवढा हलगर्जीपणा करत असेल, तर १२ कोटी जनतेला काय देणार आहे,” असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : “…तर अधिवेशन संपण्यापूर्वीच हे सरकार अपात्र ठरेल”, अमोल मिटकरींचं मोठं विधान!
यावर आशिष शेलार यांनी म्हटलं, “विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा कार्यक्रम घोषित केला होता, तेव्हा धनंजय मुंडे असते, तर ही आदळाआपट करावी लागली नसती. विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलेल्या कार्यक्रमात मुंबईची चर्चा होणार होती. त्यानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा होती.”
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची कोकणातील ‘उत्तर सभा’ विस्कळित भाषणामुळे निष्प्रभ
तर, मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं, “विधानसभेत मंत्री नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लागोपाठ पाच लक्ष्यवेधी होत्या. त्यांनी जेवन करून येतो म्हटलं. मात्र, आता ते आले आहेत, त्यामुळे सभागृह तहकूब करण्याची गरज नाही.”