गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी प्रकल्पातील एका सेक्टरमधील झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे कंत्राट देताना ‘म्हाडा’ने ठरलेल्या दरापेक्षा ३०० टक्के अधिक दर अदा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत म्हाडाची घरे बांधणाऱ्या व कामाच्या दर्जाबद्दल तक्रारी असलेल्या मे. बी. जी. शिर्के या कंपनीनेच हे कंत्राट पटकावण्यात यश मिळविले आहे.
धारावीचा कायापालट स्वत:च करण्याचे शासनाने ठरविल्यानंतर सेक्टर पाचच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले. सुरुवातीला म्हाडाने तेथील झोपडीवासीयांसाठी प्रत्येकी ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची ३४४ घरे बांधण्याचे ठरविले. तीन विंग असलेली १४ मजल्यांची इमारत बांधण्यासाठी जागा निश्चित करून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. युनिटी कन्स्ट्रक्शन, रेलकॉन आणि बी. जी. शिर्के अशा तीनच निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी आवश्यक ती कागदपत्रे सादर करू न शकल्याने युनिटी कन्स्ट्रक्शन बाद झाली तर रेलकॉनचा अनुभव कमी असल्याचे कारण पुढे करीत शिर्के यांच्या कंपनीची निविदा निश्चित करण्यात आली. शिर्के आणि म्हाडा हे ‘संबंध’ खूप जुने आहेत. म्हाडाच्या घरांची सर्वच कंत्राटे या कंपनीने पटकावली आहेत. विशिष्ट क्षेत्रफळाचे काम आपल्याच कंपनीला देण्यात यावे, असा या कंपनीने थेट केंद्र सरकारकडूनच आदेश आणला होता. त्याची मुदत संपली असली तरी त्यांना कंत्राटे देणे सुरूच आहे. म्हाडातीलच अनेक निवृत्त अधिकारी या कंपनीच्या सेवेत असल्याची ही करामत असल्याचे बोलले जाते.
शिर्के कंपनीकडून प्री-फॅब टेक्नॉलॉजीचा वापर करून धारावीवासीयांसाठी इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी प्रति चौरस फूट ८२४ रुपये इतका शासकीय दर आहे. परंतु अद्ययावत तंत्र  तसेच पायाभूत सुविधांमुळे शिर्के कंपनीला प्रति चौरस फूट २४१५ रुपये इतका दर म्हाडाने देऊ केला आहे.
तसे पत्र शिर्के कंपनीला पाठविण्यात आले आहे. नियोजन, आराखडा, बांधणी आणि आवश्यक त्या परवानग्या आदी गृहीत धरून हा दर निश्चित करण्यात आल्याचे नमूद करणाऱ्या या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. शासकीय दराचा विचार केल्यास त्यात तब्बल ३०० टक्के वाढ असल्याचे दिसून येते. सामान्यांसाठी म्हाडाकडून बांधली गेलेली घरे शिर्के कंपनीनेच सिपोरेक्स तंत्रज्ञानाचा वापर करून बांधली आहेत.
या बांधकामासाठी निश्चित करण्यात आलेला दरही कमी असताना वाढीव दराने कंत्राट देण्यामागे सोटेलोटे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्य अधिकारी सतीश गवई यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधला असता, याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार देण्यात आला. तेथील एका अधिकाऱ्याने हा दर कसा बरोबर आहे हे नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. आपला भ्रमणध्वनी द्या आणि कंपनीचा प्रवक्ता संपर्क साधेल, असेही त्याने सांगितले. ईमेलद्वारे विचारलेल्या प्रश्नांनाही प्रतिसाद देण्यात आला नाही.    
शिर्के कंपनीवर मेहेरनजर..
आपल्या भूखंडावरील झोपु योजना स्वत:च राबविण्याचे ठरविल्यानंतर त्यासाठी निविदा काढण्याआधीच म्हाडाने गोरेगाव पहाडी परिसरातील झोपु योजना बी. जी. शिर्के कंपनीच्या पदरात टाकली आहे.
घरे – ३४४
क्षेत्रफळ – ३०० चौरस फूट
दर – २४१५ रुपये प्रति चौरस फूट
एकूण कंत्राट – ४९ कोटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा