मुंबई : धारावीमध्ये अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुंभारवाड्यातील रहिवाशांचे मुलुंड कचराभूमीच्या जमिनीवर पुनर्वसन करण्याचा घाट घातला जाण्याची शक्यता आहे. अलिकडेच यातील काही जणांनामुलुंडची जागा दाखविण्यासाठी नेण्यात आले होते. त्यामुळे कुंभारवाड्याचे रहिवासी संतप्त झाले असून आपल्याला धारावीमध्येच जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मुलुंडमधील कचराभूमीची १० एकर जागा लवकरच ताब्यात घेतली जाणार आहे. धारावीमधील अपात्र रहिवाशांचे तेथे पुनर्वसन केले जाणार आहे. पात्र रहिवाशांना धारावीतच घरे दिली जाणार असताना कुंभारवाड्याच्या पुनर्वसनाबाबत धारावी पुनर्वसन प्रकल्पाने (डीआरपी) अद्याप कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. असे असताना नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमडीपीएल) कुंभारवाड्यातील रहिवाशांना बसमध्ये बसवून मुलुंड कचराभूमीची जागा दाखविण्यास नेले. आपल्याला फसवून तेथे नेल्याची आणि मुलुंडमध्ये पुनर्वसन अमान्य असल्याची ओरड रहिवाशांनी केल्यानंतर काही काळ गोंधळ झाला.
शंभर वर्षांहून अधिक काळ धारावीत राहणाऱ्यांचे धारावीबाहेर पुनर्वसन कसे, असा प्रश्न या रहिवाशांनी केला आहे. मूळच्या धारावीकरांनाही शहराबाहेर फेकण्याचा हा डाव असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. दरम्यान, मुलुंडला गेलेल्या काही जणांनी अपात्र रहिवाशांसाठीही ती जागा अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मुलुंडची जागा दाखविण्यास नेल्यामुळे कुंभारवाड्याचे रहिवासी संभ्रमित आणि संतप्त झाले आहेत. पात्र आणि मूळ धारावीकरांनाच बाहेर फेकण्याचा हा डाव असून धारावी बचाव आंदोलनाने त्याविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार बाबूराव माने यांनी दिली. धारावीतील एका रहिवाशाला धारावीबाहेर जाऊ दिले जाणार नाही, असा इशाराही माने यांनी दिला. कुंभारवाड्यातील रहिवाशांना मुलुंडला नेण्यात आले होते का आणि त्यांचे कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार का, अशी विचारणा एनएमडीपीएलकडे करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. तर या रहिवाशांना मुलुंडची जागा दाखविण्यास नेल्याबाबत आपल्याला अद्याप माहिती नसल्याचे डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी सांगितले. पुनर्वसन नियमानुसार आणि योग्य प्रकारे होईल, असेही ते म्हणाले.
‘त्याच जागी घरे द्या’
साडेबारा एकराच्या कुंभारवाड्याचे त्याच जागी सहा एकरांवर पुनर्वसन करावे. प्रदूषण टाळण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर अत्याधुनिक विद्युत भट्ट्यांची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी कुंभारवाड्यातील रहिवाशांची मागणी आहे. दिशाभूल करून रहिवाशांना जागा दाखविण्यास नेणे, जबरदस्तीने जागेची मोजणी करणे, सर्वेक्षण करणे अशा गोष्टी त्वरित थांबवाव्या अशीही त्यांची मागणी असून तसे निवेदन आज, सोमवारी डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना देण्यात येणार असल्याचे कुंभारवाड्यातील रहिवासी आदम यांनी सांगितले.
आम्ही शंभर वर्षांहून अधिक काळ येथे राहात आहोत. व्यवसाय करत आहोत. कुंभारवाडा झोपडपट्टी नाही. आमचे पुनर्वसन धारावीतच केले जाणार असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. असे असताना आता अचानक ६०-७० रहिवाशांना मुलुंड कचराभूमीची जागा दाखविण्यासाठी नेण्यात आले. त्यांना मदर डेअरीची जागाही दाखविण्यात आली. – विजय वाघेला, कुंभारवाड्याचे रहिवासी